हा पारंपारिक काढा देईल सर्दीपासून आराम


सध्या पावसाचे दिवस असल्याने हवेमध्ये थोडा फार गारवा आला आहे. तसेच पावासाने उघडीप दिली, की ऊन पडून मधेच उकाडाही जाणवत आहे. हवामानातील या वारंवार होणाऱ्या बदलामुळे सर्दी-खोकला, ताप, इत्यादी सामान्य आजार उद्भवण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्दी खोकला असतानाच, घसा दुखणे, नाक चोंदणे, किंवा सतत वाहणे याही समस्या असतातच. त्यासाठी औषधोपचार घेत असतानाच घरगुती काढा घेतल्यानेही लाभ होऊ शकतो. आपल्याकडे हा काढा बनविण्याची पद्धत अतिशय जुन्या काळापासून चालत आली असून, पूर्वीच्या काळी सर्दी-खोकला, ताप या सामान्य विकारांवर हा काढाच रुग्णाला दिला जात असे. या काढ्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतोच, त्याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत मिळते.

हा काढा बनविण्यासाठी दीड कप पाणी, दोन लवंगा, दोन चमचे आल्याचा रस (आले किसून ते हाताने घट्ट पिळत रस काढून घ्यावा), एक लहान चमचा काळ्या मिऱ्यांची पूड, तीन तुळशीची पाने, आणि चिमुटभर दालचिनीची पूड इतके साहित्य आवश्यक आहे. हा काढा तयार करण्यासाठी दीड कप पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आल्याचा रस आणि तुळशीची पाने घालावीत. आता मंद आचेवर हे मिश्रण उकळू द्यावे. दोन मिनिटे हे मिश्रण उकळल्यानंतर त्यामध्ये काळ्या मिऱ्यांची पूड आणि लवंगा घालाव्यात. त्यानंतर आणखी मिनिटभर हे मिश्रण उकळून आच बंद करावी. हा काढा गरम असतानाच पिण्यास द्यावा.

हा काढा शक्यतो रात्री झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्यायला जावा. काढा गरम असतानाच प्यायचा आहे. या काढ्यामध्ये वरून एक चिमुटभर दालचिनीची पूड घालावी आणि मग हा काढा प्यावा. हा काढा चार ते पाच दिवस नेमाने प्यायल्याने सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही