हे पाप ‘भारतरत्न’ने धुतले जाणार नाही!


काँग्रेसची विद्यार्थी विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासून आणखी एक घोडचूक केली आहे. आधीच निरनिराळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या पक्षाला उभारी देण्याऐवजी पक्षाला गोत्यात आणण्याचे कामच या कार्यकर्त्यांनी केले आहे. आता त्यावर उतारा म्हणून स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. पण बूंद से गई वह हौद से नहीं आती म्हणतात त्या प्रमाणे एनएसयूआयचे हे पाप भारतरत्नने धुतले जाणार नाही.

त्याचे झाले असे, की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग या क्रांतिकारक त्रिमूर्तीचे एकत्रित पुतळे बसवले होते. बुधवारी रात्री एनएसयूआय कार्यकर्त्यांनी यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले! ही अतिशय संतापजनक कृती असून याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे. हा अपमान केवळ स्वा. सावरकरांचा नव्हे, तर क्रांतीकारकांच्या चळवळीचा आणि देशप्रेमी नागरिकांचा आहे.

स्वा. सावरकरांच्या विचारसरणीबाबत मतभेद असू शकतात. तसे ते अनेकांचे आहेत. मात्र म्हणून त्यांच्या पुतळ्याची अशा प्रकारे त्यांच्या मृत्यूनंतर विटंबना करणे कोणालाही शोभणारे नाही. यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सावरकरांबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते. मात्र त्यांनी जी गोष्ट शाब्दिक पातळीवर मर्यादित ठेवली ती त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष करून दाखवली आहे.

सावरकरांचा त्याग सदैव प्रेरणादायी आहे. सावरकरांशी तीव्र वैचारिक मतभेद असलेल्या काँग्रेस नेत्यांनी किंवा साम्यवादी-समाजवादी मंडळींनीही त्यांच्या देशभक्ती अथवा निर्भयतेविषयी कधी शंका घेतली नव्हती. स्वतः महात्मा गांधींनी “त्याग हा आम्हा उभयतांना एकत्र आणणारा दुवा आहे” असे उद्गार 1944 साली काढले होते. “सावरकर हे धैर्य, शौर्य, निर्भयता नि प्रखर राष्ट्रभक्ती यांचे प्रतीक असून, भारतीय जनतेची स्वातंत्र्याकांक्षा प्रज्वलित करण्यासाठी महान श्रम सोसलेले ते अग्रेसर नेते आहेत,” असा गौरव राजाजींनी 1937 साली केला होता. “माझे स्फूर्तिदाते निर्भय पुरुष” या शब्दांत कम्युनिस्ट नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा गौरव केला होता. सावरकरांचे निधन झाल्यानंतर लोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडणाऱ्या लोकसभेच्या दोन सदस्यांतील एक साम्यवादी पक्षाचे प्रा. हिरेन मुखर्जी होते. फार कशाला, माजी पंतप्रधान व  राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीही सावरकरांबद्दल “सावरकर म्हणजे साहस नि देशभक्ती यांचे समीकरण,” असे उद्गार काढले होते.

वास्तविक सावरकर हे तसे उपेक्षित राहिले होते. त्यांच्या क्रांतिकार्याची स्वातंत्र्यानंतर उपेक्षाच करण्यात आली, मात्र तेही परवडले म्हणावे असा त्यांचा अपमान स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी सुरू झाला. देशभक्ती आणि निर्भयता या सावरकरांच्या सर्वमान्य गुणांविषयी शंका घेणारा लेख सर्वप्रथम ‘फ्रंटलाइन’ (7 एप्रिल 1996) या इंग्रजी पाक्षिकाने छापला. तेव्हापासून अशा प्रकारची टीका वारंवार करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि अंदमानच्या विमानतळाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने केला. तसेच सेल्युलर जेलबाहेर त्यांच्या काव्यपंक्ती कोरण्यात आल्या. तसेच लोकसभेमध्ये सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे हे सरकार सावरकरांच्या मार्गाने जात आहे आणि त्यांच्या विचारावर चालत आहे, असे भाजपविरोधकांना वाटू लागले.

त्यानंतर सावरकर यांच्यावर टीका सुरु झाली. त्यांना माफीवीर इत्यादी विशेषणे लावण्यात येऊ लागली. ती अपमानाची मालिका आजही सुरू आहे. हा अपमान कायमचा थांबवण्यासाठी स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. यापूर्वी शिवसेनेनेही अशीच मागणी केली होती. आता हिंदू जनजागृती समितीने ही मागणी केली आहे. मात्र भारतरत्न हे काही प्रमाणपत्र नाही, की ते कोणाला बहाल करून त्याचे चारित्र्य शाबित करावे.

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. तो काही लोकांनी कोणाला मोठे मानावे म्हणून देण्याची उपाधी नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वावदूकपणा केला म्हणून त्याला उत्तर हे काँग्रेस नेत्यांची वक्तव्येच आहेत. सावरकरांचे मोठेपण स्वयंसिद्ध आहे. त्याला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

Disclaimer: या लेखात मांडली गेलेली मते आणि दृष्टीकोन लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी माझा पेपर व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. तसेच वरील लेखाची कोणत्याही प्रकारची जवाबदारी माझा पेपर घेत नाही