आता केवळ अमेरिकेत जन्म घेऊन भागणार नाही!


अमेरिका ही स्वप्नभूमी मानली जाते. अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. प्रत्येकाचे नशीब अर्थातच एवढे जोरदार नसते. त्यामुळे त्यांना हे नागरिकत्व मिळण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. मात्र यातूनही एक पळवाट आतापर्यंत अस्तित्वात होती आणि ही पळवाट बंद करण्याचा विचार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. अमेरिका देशातच, परंतु गैर- अमेरिकी नागरिकांच्या पोटी, जन्मलेल्या लोकांना नागरिकत्व देणारा कायदा रद्द करण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले आहे. त्यामुळे ज्यांचे आई-वडील अमेरिकी नागरिक नाहीत त्यांना आपोआप नागरिकत्व मिळणार नाही.

‘‘जन्मजात नागरिकत्वाचा अर्थ असा आहे, की तुम्ही सीमेपलीकडून येता, बाळाला जन्म देता, अभिनंदन आहे. बाळ आता अमेरिकेचे नागरिक आहे. आमच्या भूमीवर आपले बाळ जन्मले आहे… खरे सांगायचे म्हणजे ही शुद्ध बकवास आहे. आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत,” असे जन्मजात नागरिकत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले. ते म्हणाले, “जगातील आम्ही एकमेव देश आहोत जिथे एखादी व्यक्ती येते, तिला बाळ होते आणि ते मूल वयाच्या 85 व्या वर्षांपर्यंत अमेरिकेच्या नागरिकाचे सर्व फायदे घेते. हे संपले पाहिजे,” असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी असा दावा करण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या ऑक्टोबर महिन्यातही त्यांनी याच आशयाचे विधान केले होते. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा प्रचार करताना 2016 साली जन्मजात नागरिकत्व समाप्त करण्याचे आश्वासन दिले होते. जन्मजात नागरिकत्वा हक्क हा बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी चुंबक म्हणून काम करतो, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अशा बाळांना ट्रम्प हे उपहासाने अँकर बेबी म्हणतात.

तरीही त्यांची ही योजना सहजासहजी अंमलात येण्याजोगी नाही. कारण अमेरिकेच्या भूमीत जन्मलेल्या कोणत्याही बाळाला नागरिकत्व दिले जावे मग त्याच्या पालकांचे नागरिकत्व कोणतेही असो, अशी तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेत 14व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली होती. ट्रम्प यांनीच नियुक्त केलेल्या जेम्स हो या केंद्रीय अपील कोर्टाच्या न्यायाधीशांनीच 2006 मध्ये या विषयावर लेखन केले होते. मे फ्लॉवर जहाजावरील प्रवाशांच्या वंशजांना जन्मजात नागरिकत्वाचे जेवढे अधिकार आहेत तेवढेच अवैध पालकांच्या संततीलाही असायला हवे, असे त्यांनी म्हटले होते. इंग्लंडच्या साउधॅम्टनहून या बंदरातून 1620 मध्ये मेफ्लॉवर या जहाजातून इंग्लिश प्रवासी गेले होते. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी मानली जाते. त्याचा निर्देश हो यांनी केला होता.

त्यामुळे ट्रम्प यांनी असे काही पाऊल उचलले तरी त्यावर दीर्घ कायदेशीर लढाई लढली जाईल, यात शंका नाही. परंतु कायद्यातील हा बदल केवळ कार्यकारी आदेशाने घडवून आणता येईल, असे आपल्या वकिलांनी ठामपणे सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अर्थात या तरतुदीचा गैरवापर करणारेही काही कमी नाहीत. अमेरिकेत येऊन बाळाला जन्म द्यायचा आणि त्याला नागरिकत्व मिळाले की अमेरिकेतच स्थायिक व्हायचे, हा मार्ग अनेकांना वापरला आहे. अशा प्रकारे केवळ बाळाला जन्म देण्यासाठी किती परदेशी स्त्रिया अमेरिकेत प्रवास करतात याबद्दलची कोणतीही आकडेवारी नाही. अमेरिकेत स्थलांतरितांवर नियंत्रण आणण्याची मागणी करणाऱ्या सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीज या संस्थेच्या अंदाजानुसार, 2012 मध्ये अंदाजे 36,000 गैर-अमेरिकी महिलांनी अमेरिकेत बाळांना जन्म देऊन तो देश सोडला.

फ्लोरिडासारख्या प्रांतात अशा प्रकारे अनेक परदेशी नागरिक केवळ प्रसूतीसाठी येतात. प्रसूती पर्यटन (बर्थ टूरिझम) नावाने हा प्रकार ओळखला जातो. दर वर्षी शेकडो गर्भवती रशियन महिला बाळाला जन्म देण्यासाठी अमेरिकेत येतात. त्यांच्या प्रवासाची कागदपत्रे, निवास आणि रुग्णालयातील मुक्कामाची व्यवस्था करणाऱ्या दलालांना 20,000 ते 50,000 डॉलरपेक्षा जास्त रक्कम मिळते. चीन आणि नायजेरियातील अनेक महिला याच कारणासाठी अमेरिकेत येतात.

अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर कठोर नियंत्रणे आणण्याची भलावण ट्रम्प सरकारच्या काही कट्टर सल्लागारांनी केली आहे. अवैध स्थलांतरितांच्या मुलांना किती काळ तुरुंगात ठेवता येईल यावर मर्यादा घालणारा एक कायदा गेल्या बुधवारी रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची वक्तव्ये आली होती. त्यावर टीकाही झाली.

कॅलिफोर्नियामधील सिनेटच्या सदस्या आणि डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या टिपणीची खिल्ली उडवताना म्हटले आहे की त्यांनी गांभीर्याने राज्यघटनेचे वाचन करायला हवे. माध्यमांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र ट्रम्पनी आतापर्यंत ज्या प्रकारे राज्याचा गाडा हाकला आहे, ते पाहता हा निर्णयही ते रेटून नेऊ शकतात. कोणी सांगावे?

Leave a Comment