अशी आहे जॉनी डेपची लाईफस्टाईल


हॉलीवूडमधल सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी डेप हे एक बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्व आहे, यावर बहुतेक सर्वांचेच एकमत असते. जॉनी डेप यांचे नाव उच्चारले, की त्यांनी साकारलेल्या ‘पायरट्स ऑफ द कॅरिबियन’ मधील ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’, ‘एडवर्ड सीजरहँड्स’, ‘स्लीपी हॉलो’ चित्रपटातील ‘इन्स्पेक्टर इकबोड क्रेन’, आणि अर्थातच ‘अॅलिस इन वंडरलँड’ मधील ‘मॅड हॅटर’ या आणि अश्या अनेक चित्रपटांतील उत्तमोत्तम भूमिका क्षणार्धात आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अतिशय प्रसिद्ध व्यक्ती असूनही जॉनी डेप हे अतिशय दिलदार, आणि अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे व्यक्तित्व आहे. या गुणी कलाकाराच्या आयुष्याबद्दल काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.

जॉनी डेप यांचे संपूर्ण नाव जॉन क्रिस्टोफर डेप असे असून, त्यांचा जन्म १९६३ साली ओवेन्सबरो, केंटकीमध्ये झाला. डेप यांच्या परिवाराने त्यांच्या वडिलांच्या नोकरीखातर अनेकदा स्थलांतर केले. अखेरीस फ्लोरिडामधील मिरामार मध्ये हे कुटुंब स्थायिक झाले. जॉनी पंधरा वर्षांचे असताना त्यांचे माता-पिता वेगळे झाले. त्यानंतर जॉनी यांनी शिक्षण सोडले. त्यांना लहानपणापासूनच रॉकस्टार बनण्याची इच्छा होती. त्या दिशेने वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘द किड्स’ नामक रॉकबँडमध्ये जॉनी गिटार वाजवीत असत. इतरही अनेक प्रसिद्ध बँड्स मध्ये जॉनी गिटार वाजवीत असत. आज इतके प्रसिद्ध अभिनेते असूनही जॉनी त्यांना शक्य होईल तेव्हा ‘हॉलीवूड व्हॅम्पायर्स’ नामक बँडसोबत गिटार वाजवीत असतात.

रॉक संगीत जगतात मनासारखे यश जॉनी यांना मिळत नव्हते. त्यावेळी ते ‘रॉक सिटी एंजल्स’ नामक बँडसाठी गिटार वाजवीत असत. त्याच बँडमधील त्यांच्या सहकलाकार गायिककेची बहिण लॉरी अॅन अॅलिसन हिच्यासोबत जॉनी १९८३ साली विवाहबद्ध झाले. लॉरी त्यावेळी मेकअप आर्टिस्ट म्हणून, तर जॉनी एका पेन कंपनीसाठी टेलीमार्केटिंगचे काम करीत होते. त्यावेळी त्यांनी अभिनेते निकोलस केज यांचे घर भाड्याने घेऊन त्या घरात आपला संसार थाटला होता. जॉनी आणि निकोलस केजची ओळख तेव्हापासूनची असून, निकोलस यांनी जॉनीने आपल्या हॉलीवूड एजंटला भेटावे असा हट्ट धरला. निकोलसने जॉनीची ओळख आपल्या एजंटशी करून दिली, आणि त्यामार्फतच १९८४ साली जॉनीला ‘नाईट ऑन द एल्म स्ट्रीट’ या चित्रपटामध्ये भूमिका करण्याची संधी लाभली.

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ’21 जंप स्ट्रीट’ या चित्रपटाने जॉनी यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर १९९० साली आलेल्या ‘एडवर्ड सीजरहँड्स’ मधील प्रमुख भूमिकेने जॉनीची ओळख एक गुणी अभिनेता म्हणून सर्व जगाला झाली. विशेष गोष्ट अशी, की आजवर ६९ चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारलेल्या जॉनी डेप यांना आजवर एकही ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही. आजवर तीन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन जरूर केले गेले होते, मात्र हा पुरस्कार अद्यापही जॉनीला लाभलेला नाही. ज्या वेळी ‘पायरट्स ऑफ द कॅरिबियन’ या चित्रपटाच्या प्रथम भागाचे चित्रीकरण सुरु होते, तेव्हा जॉनी ज्या पद्धतीने कॅप्टन जॅक स्पॅरोची भूमिका साकारत होते, ती पद्धत निर्मात्यांनी फारशी पसंत पडत नव्हती. त्यांनी जॉनीला तसे बोलूनही दाखविले. पण आपण ज्याप्रकारे ही भूमिका साकारत आहोत, तीच पद्धत योग्य असून, ती पसंत पडत नसेल, तर चित्रपट सोडण्याची तयारी देखील जॉनीने दर्शविली. त्यानंतर मात्र ही भूमिका त्याच्या मनाप्रमाणे साकारण्याची मुभा निर्मात्यांनी जॉनीला दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुपरहिट झाला, आणि केवळ हाच चित्रपट नाही, तर चित्रपटमालिकेतील सर्वच भागांना उत्तुंग यश लाभले.

Leave a Comment