एवढ्या महामूर संपत्तीचे मालक आहेत चिदंबरम


नवी दिल्ली – मोठ्या ड्राम्यानंतर बुधवारी रात्री माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काल चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या संपत्तीबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत. केवळ देशातच नाही तर परदेशातही कोट्यवधींची चिदंबरम यांच्याकडे संपत्ती आहे. तब्बल 8.6 कोटी रूपये एफडी आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हेदेखील आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी घोषित केल्याप्रमाणे सध्या 175 कोटी रूपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे.

तब्बल 95 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती चिदंबरम आणि त्यांच्या पत्नीकडे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 5 कोटी रूपयांचे कर्ज आपल्यावर असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर 80 कोटी रूपयांची संपत्ती कार्ती चिदंबरम यांच्याकडेही असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 9.75 कोटी त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, अन्य संस्थांमध्ये चिदंबरम यांचे 25 कोटी जमा आहेत आणि पाच लाखांची रोकडही त्यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. तर 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स त्यांच्याकडे आहेत. तर त्यांनी काही योजनांमध्येही 35 लाखांची गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडे दहा लाखांच्या विमा, 85 लाखांचे दागिने आणि 27 लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये 1.5 कोटी, 7 कोटींची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यवसायिक इमापकी आणि 32 कोटी रूपयांची घरे आहे.

परदेशात पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्याकडे 25 संपत्ती असल्याची माहितीही सीबीआयकडून देण्यात आली. तसेच कंपनीच्या नावावर ही संपत्ती खरेदी करण्यात आल्याचेही सीबीआयच्या वकीलांनी सांगितले. त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यांची 54 कोटी रूपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. भारत, ब्रिटन आणि स्पेनमधील संपत्तीचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये तामिळनाडूतील शेतजमीन, दिल्लीतील बंगला, ब्रिटनमधील कॉटेज आणि घर, स्पेनमधील टेनिस क्लब, चेन्नईच्या बँकेतील एफडीचा समावेश आहे.

Leave a Comment