लवकरच रेल्वेने करता येणार थेट दिल्ली ते लेह प्रवास


लवकरच राजधानी दिल्ली ते नयनरम्य लेह पर्यंतचा थेट प्रवास रेल्वेने करता येणार असून, हा रेल्वेमार्ग बहुधा जगातील सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ८३,३६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या प्रवासासाठी वीस तासांचा अवधी लागणे अपेक्षित आहे. या पूर्वी लेहला पर्यटनासाठी जाणाऱ्या मंडळींना जम्मू पर्यंत रेल्वेने जाऊन मग लेह पर्यंत पोहोचता येत असे, किंवा दिल्ली पासून विमानाने लेहला जाता येत असे. आता मात्र दिल्लीपासून थेट लेह पर्यंतचा रेल्वेप्रवास निसर्गाचे सौंदर्य न्याहाळताना करण्याची संधी लवकरच पर्यटकांना मिळणार आहे.

दिल्ली पासून हा रेल्वेमार्ग सुंदरनगर, मंडी, मनाली, कीलोंग, कोकसर, दर्चा, उपशी इत्यादी स्थानांच्या मार्गे लदाख पर्यंत जाणार असून, या पैकी पुष्कळसा रेल्वे प्रवास बोगद्यांतून होणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण तीस स्थानके असणार आहेत. सध्या दिल्ली ते लेह प्रवासाला जितका वेळ लागतो, त्याच्या मानाने हा थेट प्रवास कमी वेळाचा असणार असून, पुढील दोन वर्षांमध्ये या मार्गाचे विस्तृत सर्वेक्षण करून प्रवासाचा वेळ आणखी कमी व्हावा यासाठी कश्याप्रकारे रेल्वेमार्गाचे नियोजन केले जावे, याचा विचार करण्यात येणार आहे. दिल्ली ते लेह प्रवासाचे अंतर ४६५ किलोमीटरचे असणार असून, या रेल्वेमार्ग निर्मितीसाठी तब्बल ८३,३६० कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.

दिल्ली ते लेह या रेल्वेमार्गावर तब्बल ७४ बोगदे असणार असून, १२४ पूल, आणि त्या व्यतिरिक्त ३९७ लहान पूल असणार आहेत. या सर्व बोगाद्यांपैकी एका बोगद्याची लांबी तब्बल २७ किलोमीटर असणार आहे ! कीलोंग या मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानक असणार असून, समुद्र सपाटीपासून तीन हजार मीटरच्या उंचीवर हे रेल्वेस्थानक निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे रेल्वेस्थानक भारतातील सर्वाधिक उंचावर असणारे रेल्वेस्थानकही ठरणार असून, दिल्ली-लेह रेल्वेमार्ग जगातील सर्वात उंचावर असणारा रेल्वेमार्ग ठरणार आहे. या रेल्वेमार्गावरील सर्वात उंचावरील प्रवासाचा टप्पा १६,६२७ फुटांच्या उंचीवरून असणार आहे. हा रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेमार्फत सुरु होणारा आजवरचा सर्वात अवघड आणि आव्हानात्मक प्रकल्प म्हटला जात असून, या रेल्वेमार्गाच्या निर्मितीमध्ये अनेक आव्हाहांना तोंड द्यावे लागणार आहे.

Leave a Comment