त्वचेवर पुरळ आल्यास अवलंबा हे उपाय


अनेकदा आपण नव्याने वापरत असलेल्या वस्तूची आपल्याला अॅलर्जी असली, तर त्याची परिणती अंगावर बारीक रॅश किंवा पुरळ येण्यात होते. अनेकदा रॅशच्या रूपात मोठे मोठे फोडही त्वचेवर येऊ शकतात. हे पुरळ आल्यानंतर त्वचेला वारंवार खाज सुटू शकते. एखादा नवा कपडा, एखादे सौंदर्य प्रसाधन, एखादा किडा चावल्याने, घामामुळे, नवा साबण, किंवा शँपू, तेल वापरल्याने किंवा क्वचित आपण खाल्लेल्या एखाद्या पदार्थामुळे देखील अॅलर्जी येऊन अंगावर पुरळ येऊ शकते. अनेकदा आजारपणामध्ये घेतलेल्या एखाद्या औषधामुळे, किंवा एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळेही अंगावर पुरळ येऊ शकते. अश्या प्रकारचे पुरळ त्वचेवर आले, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते, पण काही कारणाने त्वरित डॉक्टरांकडे जाणे शक्य होणार नसल्यास काही घरगुती उपचार करून पाहता येऊ शकतात. या उपायांमुळे त्वचेवरील खाज कमी होऊन त्वचेचा होणारा दाह कमी होण्यात नक्कीच मदत मिळू शकते.

बेकिंग सोडा, म्हणजेच खाण्याचा सोडा बहुतेक सर्वच स्वयंपाकघरांमध्ये असतोच. त्वचेवर पुरळ आले असल्यास त्यावर बेकिंग सोडामध्ये थोडेसे पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून ही पेस्ट पुरळावर लावल्यास खाज कमी होते. ही पेस्ट बनविण्यासाठी चार चमचे सोड्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून पेस्ट तयार करावी, आणि ही पेस्ट पुरळ असेल त्यावर लावावी. ही पेस्ट दहा मिनिटे तशीच राहू देऊन त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाकावी. बेकिंग सोडा प्रमाणेच अॅपल सायडर व्हिनेगरही पुरळ कमी करण्यास सहायक आहे. यामध्ये असलेले अॅसेटिक अॅसिड पुरळ आणि त्यावरील खाज कमी करण्यास सहायक आहे. दोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा सायडर व्हिनेगर मिसळावे आणि कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने पुरळ असेल त्यावर लावावे. हा उपाय चार ते पाच दिवस करावा. व्हिनेगरमधील आम्लतेमुळे त्वचेची आग होण्याची शक्यता असल्याने ज्यांची त्वचा कोरडी आहे, किंवा खाजाविल्यामुळे त्वचेवर ओरखडे आले असल्यास व्हिनेगरचा वापर करू नये.

त्वचेवर पुरळ आल्यास सुटणारी खाज आणि त्वचेवर आलेला लालसरपणा कमी करण्यासाठी आईस पॅकचा वापर करावा. आईस पॅक च्या वापरामुळे त्वचेवर आलेली हलकी सूज कमी होऊन खाज कमी होण्यासही मदत होते. कोरफडीचा गर, किंवा अॅलोव्हेरा जेल देखील पुरळ कमी करणारी आणि त्वचेला थंडावा देणारी आहे. याच्या वापराने पुरळ कमी होतेच, त्याशिवाय त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेला आर्द्रताही प्राप्त होते. पुरळ कमी करण्यासाठी ताजी कोथिंबीरीची पाने बारीक वाटावीत आणि ही पेस्ट पुरळ आलेल्या ठिकाणी लावावी, त्यामुळे त्वचेची खाज त्वरित कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment