जिया खान आत्महत्या प्रकरणावर आधारित माहितीपट बनविणार ब्रिटीश निर्माता?


दिवंगत अभिनेत्री जिया खान हिने २००७ साली ‘निशब्द’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका अमिताभ बच्चन यांची होती. त्यानंतर ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ सारख्या चित्रपटांमध्येही जियाने भूमिका केल्या होत्या. २०१३ साली जिया खानच्या अकस्मात मुत्युच्या बातमीने संपूर्ण बॉलीवूड हादरून गेले. ३ जून २०१३ साली या तरुण अभिनेत्रीने मुंबईतील स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण बॉलीवूड हादरून गेले होते. या घटनेला आता सहा वर्षे उलून गेली असताना एका ब्रिटीश टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरने या घटनेवर आधारित माहितीपट बनविण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. हा माहितीपट तीन भागांमध्ये बनविला जाणार असून, यामध्ये या घटनेशी निगडित अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिया खान सुइसाइड केसचा तपास अद्यापही सुरु असून आतापर्यंतच्या तपासातून फारसे निष्पन्न होऊ शकलेले नाही.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्ताच्या अनुसार एका सुप्रसिद्ध ब्रिटीश टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरला जिया खान सुइसाइड केसवर आधारित माहितीपट बनविण्याची इच्छा असून, याच संदर्भात त्याचे मुंबईमध्ये आगमन झालेले आहे. हा माहितीपट बनविणारा फिल्ममेकर कोण आहे, ही आणि माहितीपटाशी निगडीत सर्वच माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली असल्याचे समजते. अभिनेत्री जिया खानचे बालपण इंग्लंडमध्ये गेले असल्याने या ब्रिटीश फिल्ममेकरला हा माहितीपट बनविण्यामध्ये विशेष रुची असल्याचे समजते. हा फिल्ममेकर आणि त्याची प्रोडक्शन टीम सध्या मुंबईमध्ये आली असून, मुंबईच्या उपनगरातील एका हॉटेलमध्ये या सर्वांचे वास्तव्य असल्याचे समजते.

सहा वर्षांपूर्वी अभिनेत्री जिया खानने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी आपले आयुष्य संपविले. या वृत्ताने संपूर्ण बॉलीवूड जगतात खळबळ माजली आणि जियाच्या मृत्युच्या संबंधात अनेक तर्क वितर्क सुरु झाले. मृत्यूपूर्वी जियाचे, अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबत प्रेमसंबंध असून, त्याच्याशी झालेल्या मतभेदांमुळेच जियाने आत्महत्या केली असावी असे ही म्हटले गेले होते. जियाच्या आईने मात्र ही आत्महत्या नसून, सूरज पांचोलीने जियाची हत्या केली असल्याचा धक्कादायक आरोप करून या सर्व प्रकरणाला वेगळीच दिशा दिली होती.

Leave a Comment