चिदंबरम यांना अटक – एवढा तमाशा कशासाठी?


आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक झाली. चिदंबरम यांच्यावर गेले दोन दिवस अटकेची टांगती तलवार होती आणि तब्बल 27 तास त्यांनी अटक टाळण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. त्यांना अटक करण्यात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआय) अखेर यश आले, तरी त्यापूर्वी जे नाट्य घडले ते टाळता येण्यासारखे होते.

पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला होता. त्यानंतर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी त्यांच्या घरी पोचले होते. मंगळवारी आपल्या कार चालकाला एकटे सोडून चिदंबरम निघून गेले ते बुधवारीच उगवले. या काळात त्यांनी आपल्या पक्ष सहकाऱ्यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही चिदंबरम यांना दिलासा दिला नाही आणि उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. चिदंबरम यांच्या वतीने काँग्रेस नेते व सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात किल्ला लढवला. ‘याचिकाकर्ता हा कायद्याचे पालन करणारा समाजातील एक सन्मानित नागरिक आहे. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्यावर गुन्ह्याचा आरोप नाही. ते न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अटक करुन चौकशी करण्याची गरज नाही.’ असा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी करून पाहिला. परंतु तो सपशेल अयशस्वी ठरला.

बुधवारी चिदंबरम यांच्या नाट्याचा पुढचा अंक सुरू राहिला. आपल्या अज्ञातवासातून बाहेर येऊन चिदंबरम काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात पोचले आणि तेथे माध्यमांशी संवाद साधून पुन्हा आपल्या निवासस्थानी परतले. त्यांच्या प्रकट होण्याची खबर लागताच सीबीआयच्या सुमारे 30 अधिकाऱ्यांचे पथक दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसह जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोचली. मात्र चिदंबरम यांनी त्यांच्यासाठी दरवाजे उघडले नाही. घराचा मुख्य दरवाजा काही वेळ ठोठावल्यानंतर या अधिकाऱ्यांनी कुंपणाची भींत ओलांडून घरात प्रवेश केला. त्यानंतर ईडीचे अधिकारीही तिथे पोचले. हा सर्व प्रकार जवळपास सर्व टीव्ही वाहिन्यांवरून थेट दाखवण्यात येत होता.

आपण कायद्यापासून पळ काढत नसून आपल्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा चिदंबरम यांनी केला. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि अभिषेक मनु सिंघवी हेही उपस्थित होते.

चिदंबरम यांचा दावा खरा असेलही. मात्र त्यांनी सीबीआय व ईडीपासून पळ काढून एवढा ड्रामा का उभा केला, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ‘‘या संस्थांनी विनाकारण नाटक आणि तमाशा करून केवळ सनसनाटी निर्माण केला. तो केवळ काही प्रेक्षकांसाठी चांगला आहे,” असे त्यांचे पुत्र कार्ति यांनी म्हटले आहे. मात्र चिदंबरम यांनी सरळपणे जर या संस्थांचा सामना केला असता तर इतके नाट्य निर्माण होण्याची काहीही शक्यता नव्हती. चिदंबरम यांनी स्वतःच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला असता तर काहीही बिघडणार नव्हते. काँग्रेस नेत्यांनीही त्यांची पत्रकार परिषद पक्ष कार्यालयात घेऊन आणखी अडचण करून ठेवली, कारण त्यामुळे चिदंबरम यांच्या पळापळीला काँग्रेसचा आशीर्वाद असल्याचे चित्र निर्माण झाले.

वास्तविक चिदंबरम हे देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री. अत्यंत हुशार वकील म्हणून त्यांचा लौकिक. त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्नातील अर्थसंकल्प (ड्रीम बजेट) म्हणून नावाजला जातो. अशा नेत्याला निव्वळ अटक करून भाजप सूड उगवू पाहत आहे, असा दावा करायला काँग्रेसला चांगलाच वाव होता. मुख्य म्हणजे आता केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांच्याशी चिदंबरम यांचे थेट वैर आहे. त्याचाही फायदा त्यांना करून घेता आला असता.

नऊ वर्षांपूर्वी, 2010 मध्ये केंद्रात काँग्रेस सरकार असताना चिदंबरम हे गृहमंत्री होते. त्यावेळी सोहराबुद्दीन शेख या गुंडाच्या खोट्या चकमकीच्या प्रकरणात सीबीआयने गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांना अटक केली होती. त्यावेळी सीबीआयने दोनदा समन्स बजावूनही शहा चौकशीला आले नव्हते आणि शहांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा टाकला होता. आता चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता तसाच जामीन शहा यांनाही नाकारण्यात आला होता. अखेर त्या प्रकरणात शहा यांना राजीनामा द्यावा लागला होता. राजदीप सरदेसाई यांनी या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. मात्र त्यांनी हे सांगितले नाही, की शहा यांनी त्या प्रकरणाचा पूरेपूर फायदा उचलला आणि राजकीय हौतात्म्य पत्करले. सीबीआयला हाताशी धरून काँग्रेस गुजरात सरकारचा आणि भाजप सरकारचा बळी घेत असल्याचे त्यावेळी शाह म्हणाले होते.

चिदंबरम यांनी तसे न करता चौकशी संस्थांपासून लपायचा पर्याय निवडला आणि विनाकारण एक तमाशा घडला. यात त्यांच्या हाती ना सुटका आली ना सहानुभूती!

Leave a Comment