यामुळे शाही घराण्यातील सदस्यांनी त्यागल्या आपल्या उपाधी ?


ब्रिटिश शाही घराण्याचे राजकुमार प्रिंस हॅरी अणि त्याची पत्नी मेघन यांचा मुलगा आर्ची याचा जेव्हा या वर्षीच्या मे महिन्यामध्ये जन्म झाला, तेव्हा त्याला कोणती शाही उपाधी देण्यात येणार याकड़े ब्रिटिश नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर या लहानग्या राजकुमाराला राणीच्या वतीने उपाधी बहाल केली जाणार असल्याचेही बोलले जात असतानाच प्रिंस हॅरी अणि मेघन या दाम्पत्याने आपल्या या मुलासाठी अणि भविष्यात होणाऱ्या संततीसाठी कोणत्याही शाही उपाधीचा स्वीकार करणार नसल्याचे जाहीर केले गेले.

आपल्या संततीला प्रसिद्धीच्या झोतापासून लांब ठेवण्याची इच्छा असून त्यांना सर्वसामन्यांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी या दाम्पत्याने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. मेघन आणि हॅरीने आपला मुलगा आर्ची याचा जन्माबद्दल पुष्कळशी माहिती खासगीच ठेवली असून, आर्चीच्या जन्माची नक्की वेळ काय होती, त्याचा जन्म या दाम्पत्याच्या निवासस्थानी झाला, की प्रसूतीगृहात झाला, आर्चीचे ‘गॉड पेरेंट्स’ कोण आहेत, इत्यादी सर्व माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

आपल्या मुलाकरिता शाही उपाधी नाकारणारे हॅरी आणि मेघन हे एकमेव शाही सदस्य नसून, जगभरातील अनेक शाही सदस्यांनी देखील शाही उपाधी नाकारल्या आहेत. स्वीडन देशाची राजकन्या मेडलाईन हिने २०१३ साली उद्योजक क्रिस्टोफर ओनील याच्याशी विवाह केला, तेव्हा स्वीडिश राजघराण्याच्या वतीने क्रिस्टोफरला देऊ करण्यात आलेली शाही उपाधी त्याने नाकारली होती.

क्रिस्टोफरला आपले ब्रिटीश-अमेरिकन नागरिकत्व सोडायचे नसल्याने त्याने या शाही उपाधीचा स्वीकार केला नसल्याचे समजते. नॉर्वेच्या राजघराण्याची राजकन्या मार्था लुईज हिने आपल्या शाही उपाधीचा वापर केवळ औपचारिक शाही कार्यक्रमांसाठी करण्याचा निर्णय घेतला असून, इतर खासगी कार्यक्रमांमध्ये ती तिच्या शाही उपाधीचा वापर न करणेच पसंत करते. राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या वडिलांचे थोरले बंधू राजे एडवर्ड (आठवे) यांनी आपली प्रेयसी वॉलिस सिम्पसन हिच्याशी विवाह करता यावा यासाठी राज्य त्यागले होते. वॉलिस सिम्पसन एकतर अमेरिकन नागरिक होती, आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे तिचा तीन वेळा घटस्फोट झालेला होता. त्यामुळे ब्रिटीश शाही घराण्यामध्ये राणी म्हणून तिचा प्रवेश होण्यास मंजुरी मिळणे केवळ अशक्य होते.

राजे एडवर्ड यांचा वॉलिसशी विवाह करण्याचा हट्ट कायम होता. त्यामुळे शाही परिवार वॉलिसच्या आणि त्यांच्या विवाहाला कधीही मान्यता देणार नाही हे ओळखून त्यांनी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सिंहासनाचा त्याग केल्यानंतर राणी एलिझाबेथ यांचे पिता राजे जॉर्ज(सहावे) यांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर राजे एडवर्ड आणि वॉलिस यांना ‘ड्युक अँड डचेस ऑफ विंडसर’ ही उपाधी देण्यात आली असली, तरी वॉलिसला ‘हर रॉयल हायनेस’ हे संबोधन वापरण्यास मात्र शाही परिवाराने परवानगी नाकारली होती. त्याकाळी शाही परीवाजानांना, ‘चर्च ऑफ इंग्लंड’, घटस्फोटीत व्यक्तीशी विवाह करण्याची अनुमती देत नसे. मात्र काळ बदलला, तसे नियमही बदलले. म्हणूनच मेघन मार्कल घटस्फोटिता असूनही प्रिन्स हॅरीला तिच्याशी विवाह करता येऊ शकला. राणी एलिझाबेथ ची अपत्ये प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन यांनी ही घटस्फोटानंतर दुसरे विवाह केले आहेत.

थायलंडची राजकन्या उबोलरतना अमेरिकेतील एमआयटीमध्ये शिक्षण घेत असता, तिची भेट पीटर जेन्सनशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, आणि त्या दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. मात्र पीटर सामान्य अमेरिकन नागरिक असल्याने उबोलरतनाला त्याच्याशी विवाह करण्यात अडचण येऊ शकणार होती. म्हणून विवाहबद्ध होण्यासाठी तिला आपल्या शाही उपाधीचा त्याग करावा लागला. त्यानंतर २००१ साली या दाम्पत्याचे वैवाहिक जीवन संपुष्टात येऊन त्यांचा घटस्फोट झाला, पण राजकन्येने आपली शाही उपाधी गमावली ते कायमचीच. आता तिला ‘तुन्क्रामोम यिंग’, म्हणजे ‘राणीची कन्या’ म्हणून संबोधण्यात येते.

राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांची विवाहापूर्वीची उपाधी ‘प्रिन्स ऑफ डेन्मार्क अँड ग्रीस’ अशी असून, ही उपाधी त्यांच्या जन्मानंतर त्यांना देण्यात आली होती. मात्र राणी एलिझाबेथ ब्रिटीश राजघराण्याच्या वारस आणि भविष्यातील राणी असल्याने प्रिन्स फिलीप यांना विवाहापूर्वी त्यांच्या उपाधीचा त्याग करावा लागला होता. विवाहानंतर त्यांना ‘ड्युक ऑफ एडिंबरा’ ही उपाधी देण्यात आली होती. राणी एलिझाबेथ यांची कन्या प्रिन्सेस अॅन यांचे पहिले पती मार्क फिलिप्स यांनी ही शाही उपाधी स्वीकारण्यास नकार दिला होता. प्रिन्सेस अॅन यांची अपत्ये झारा आणि पीटर फिलिप्स यांच्यासाठी राणीने देऊ केलेल्या शाही उपाधी प्रिन्सेस अॅन यांनी नाकारल्या होत्या.

Leave a Comment