पन्नाशीपार करुनही चिरतरुण आहेत या अभिनेत्री


अभिनेत्री हॉलीवूडमधल्या असोत, किंवा बॉलीवूडमधल्या, त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय सर्वत्र एकसारखेच असते. किंबहुना या अभिनेत्रींचे खासगी आणि सार्वजनिक जीवन, त्यांची जीवनशैली, त्या घालत असलेले पेहराव, त्यांचे प्रसाधन, हेअरस्टाईल इत्यादी गोष्टींमुळे या अभिनेत्री नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असतात. आणि म्हणूनच आपल्या चाहत्यांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहण्याच्या उद्देशाने सदैव आकर्षक दिसणे हा या अभिनेत्रींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. याच कारणास्तव काही अभिनेत्री पन्नाशी उलटून गेल्यानंतरही चिरतरुण असल्याप्रमाणे भासतात.

हॉलीवूड बाबत बोलायचे झाले, तर अभिनेत्री मोनिका बेलुचीचे उदाहरण देता येईल. मोनिकाने नुकतीच आयुष्याची त्रेपन्न वर्षे पूर्ण केली असली, तरी आजही तिचे सौंदर्य एखाद्या नवयुवतीलाही मागे सारेल असे मोहक आहे.

हेच अभिनीत्री ज्युलीअॅन मूरच्या बाबतीतही म्हणता येईल. ज्युलीअॅन सत्तावन्न वर्षांची असून आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून प्रतिष्ठित अकॅडमी अवॉर्ड आणि दोन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविलेली ही अभिनेत्री आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमन हिने वयाची पन्नाशी नुकतीच ओलांडली असून, ही अमेरिकन-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, निर्माती म्हणूनही कार्यरत आहे. चित्रपट सृष्टीतील तिच्या कामगिरीबद्दल निकोलला आजवर अकॅडमी पुरस्कार, दोन वेळा एमी अवॉर्ड्स, तर पाच वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे. एके काळी हॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून लौकिक संपादन केलेल्या निकोलने ‘द आवर्स’ आणि ‘मुला रूज’ सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळविले आहेत.

चिरतारुण्याचा वर लाभलेल्या अभिनेत्रींमध्ये बॉलीवूडही मागे नाही. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री रेखा यांचे म्हणायला हवे. वयाची साठी ओलांडून देखील अभिनेत्री रेखा आजही पूर्वीइतक्याच सौंदर्यवती म्हणविल्या जातात. १९६६ साली बालकलाकार म्हणून रेखा यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून रेखा यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. आपल्या कारकीर्दीमध्ये रेखा यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. २०१० साली रेखा यांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले.

‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका साकारल्या असून, त्या लवकरच सत्तरी गाठणार असल्या, तरी आजही खासदार म्हणून त्यांच्या राजनीतिक कारीकीर्दीमध्ये पुष्कळ सक्रीय आहेत. हेमा मालिनी उत्तम नृत्यांगना असून, त्यांच्या मुलींच्या समवेत भारतीय नृत्याचे अनेक कार्यक्रम त्या सादर करीत असतात. २००० साली भारत सरकारच्या वतीने हेमा मालिनी यांना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले.

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने वयाची पन्नाशी नुकतीच पार केली असून एके काळी बॉलीवूडमधील सर्वात अधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा लौकिक माधुरीने संपादन केला होता. उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर माधुरीने आजवर साकारलेल्या सर्वच भूमिका प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवून गेल्या आहेत. माधुरीला आजवर सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून, २००८ साली भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कारही माधुरीला मिळाला आहे.

Leave a Comment