डोनाल्ड आणि मेलेनिया पुन्हा बनले आजी आजोबा


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प सोमवारी मध्यरात्री १० व्या वेळी आजी आजोबा बनले आहेत. डोनाल्ड यांचा मुलगा एरिक याची पत्नी लारा हिने सोमवारी मध्यरात्री एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एरिक यांनी कॅरोलिना डोरोथी ट्रम्प या आमच्या कन्येचे जगात स्वागत करत असल्याचे आणि तिच्या जन्माने रोमांचित झाल्याचे ट्विट करून ही बातमी दिली आहे. एरिक आणि लारा यांना पहिला मुलगा आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांना तीन बायकांपासून ५ मुले आहेत. त्यातील सर्वात मोठा डोनाल्ड ज्युनिअर याला ५ तर मुलगी इव्हंका हिला तीन मुले आहेत. ही आठ आणि एरिक यांचा पहिला मुलगा मिळून डोनाल्ड यांना ९ नातवंडे होती त्यात नवीन बाळाची भर पडून ही संख्या दहावर गेली आहे. ३५ वर्षीय एरिक ट्रम्प हा डोनाल्ड यांचा तिसरा मुलगा आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तो मोठा भाऊ डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर याच्या सोबत द ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्याची पत्नी लारा ही पत्रकार असून एरिक ट्रम्प फौंडेशनचे काम पाहते. या फौंडेशन तर्फे गरीब आजारी मुलांना हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

Leave a Comment