पाकिस्तानचा आणखी एक मुखभंग!


भारताने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचा नुसता तिळपापड झाला असून काय करावे आणि काय नको, असे त्याला झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तर काहीच सुचेनासे झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही पाकिस्तानच्या हाती निराशाच आली आहे कारण जगाने भारताच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत शेवटचा उपाय म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानचे उदाहरण देऊन पाहिले. मात्र तोही प्रयत्न पुरता फसला असून अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला फटकारले आहे.

काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीची अफगाणिस्तानमधील परिस्थितीशी तुलना केल्याबद्दल अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता स्थापन करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यांची तुलना पाकिस्तानने काश्मीरमधील सद्यःस्थितीशी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करून पाहिला होता. त्यामुळे तो देश नाराज होणे स्वाभाविक होते. असा प्रयत्न केल्याबद्दल अफगाण राजदूताने पाकिस्तानच्या राजदूताची कान उघाडणी केली आहे. असा संबंध जोडणे बेजबाबदारपणाचे आणि अनावश्यक असल्याचे अफगाण राजदूताने ठणकाऊन सांगितले आहे, हे बरे झाले.

काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण असल्यामुळे त्याचा अफगाण शांतता प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद मजीद खान यांनी म्हटले होते. काश्मिर मुद्द्यावरून भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या ताज्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आपले काही सैन्य अफगाणिस्तान सीमेवरुन काश्मीर सीमेवर हलविण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेत अडथळा येऊ शकतो, असे असद मजीद खान यांनी गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले होते .

त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या अमेरिकेतील राजदूत रोया रहमानी यांनी एक प्रदीर्घ निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अफगाणमधील शांतता प्रक्रियेचा विषय काश्मीरशी जोडणे अनावश्यक आणि बेजबाबदारपणाचे आहे. हा विषय काश्मीरशी जोडून अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढतच राहावा अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यातून दिसून येते. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा आहे, असे रहमानी यांनी ठाम प्रतिपादन करून भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तसेच अफगाणिस्तानच्या भूमीवर होणाऱ्या हिंसाचाराला प्रदीर्घ काळ चालवण्याचा पाकिस्तानचा हेतू असल्याचेही दाखवून दिले आहे.

“अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला काहीही धोका नाही. पाकिस्तानने आपल्या पश्चिम सीमेवर हजारोंच्या संख्येने लष्कर ठेवण्यामागे सबळ असे काही कारण दिसून येत नाही. उलट पाकिस्तानमध्ये असलेल्या आणि त्या देशाच्या पाठिंब्याने सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमुळेच अफगाणिस्तानच्या स्थैर्यास सातत्याने धोका पोहोचत आहे,” असेही रहमानी यांनी म्हटले आहे. गंमत म्हणजे खुद्द तालिबाननेही पाकिस्तानच्या या प्रयत्नाला चपराक लगावली आहे. काश्मिर म्हणजे अफगाणिस्तान नव्हे, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले आहे.

खरे तर भारताने कलम 370 रद्द केल्यापासूनच पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला घेरण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न करून पाहिला, मात्र त्यात तो नाकावर आपटला. अगदी तो ज्या देशाला आपला अभिन्न मित्र समजतो त्या चीननेही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अखेर कोणताच देश आपल्याला धूप घालत नाही हे पाहिल्यावर इम्रान खान यांनी भाजप सरकारला ‘फॅसिस्ट हिंदु सरकार’ म्हणून बोल लावण्याचा प्रयत्न केला. जागतिक शांततेची आपल्याला काळजी आहे, हे जगाला दाखवण्यासाठी त्यांनी भारताच्या अण्वस्त्रांकडेही निर्देश केला. भारतात ‘फॅसिस्ट’ सरकार सत्तेवर असल्यामुळे ही अण्वस्त्रे असुरक्षित आहेत, अशी कागाळी त्यांनी केली. वास्तविक याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणता येईल. खरे म्हणजे पाकिस्तानचे सरकार हे तेथील सैन्याच्या हातातील बाहुले आहे. खुद्द इम्रान खान हेही पाकिस्तानी सैन्याच्या हातातील कठपुतळी आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. तसेच पाकिस्तानचे सैन्य तेथील जिहादी दहशतवाद्यांच्या तालावर नाचते. पाकिस्तानकडील अण्वस्त्रे कधीही या दहशतवाद्यांच्या हातात पडू शकतात, ही भीती पाश्चिमात्य देशांनी अनेकदा व्यक्त केली आहे.

बुडत्याला काडीचा आधार म्हणतात त्या प्रमाणे पाकिस्तानने भारताविरुद्ध हर तऱ्हेचा प्रयत्न करून पाहिला. मात्र भारताच्या शांततावादी धोरणाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली असून पाकिस्तानचे दहशतवादी धोरण त्याला भोवले आहे. त्यामुळे सगळीकडे निराशा हाती आलेल्या पाकिस्तानने आपला आणखी एक मुखभंग करून घेतला आहे.

Leave a Comment