राज ठाकरेंना नोटीस – फ्यूज काढून सप्लाय


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाठविलेल्या नोटिशीमुळे राजकारण तापले नसते तरच नवल. ऐन निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे एका प्रमुख राजकीय नेत्याला नोटीस पाठविण्याचे परिणाम सरकारला कळणार नाहीत, असे नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंना बळ देणे सरकारसाठी आवश्यक आहे. त्यामुळे उलट मनसेला मोठे करण्यासाठीच तर हा खटाटोप नाही ना, अशी शंका यायला पूर्ण वाव आहे.

‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस’ या कंपनीशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे समन्स काढण्यात आले आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. दादर परिसरातील कोहिनूर प्रकल्पाच्या चौकशीदरम्यान राज ठाकरे यांचे नाव पुढे आले. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे, असे ईडीच्या वतीने सांगण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनाही ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.

या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणार होतेच आणि ते उमटलेही. या बाबतीत पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलेन, असे मनोहर जोशी यांनी सांगितले. तर राज ठाकरेंना दिलेल्या नोटिशीकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरजनाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. मी अनेकदा सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे, मग मलाही नोटीस द्यायला हवी असे ते म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे राज यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले आहे. आणि इथेच खरी गोम आहे.

वास्तविक लोकसभेसाठी एकही उमेदवार उभा न करता राज यांनी झंझावाती सभा घेतल्या होत्या. त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, असा विरोधकांचा होरा होता. लोकसभेच्या प्रचार काळात ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी राज्यातील वातावरण चांगलेच घुसळून काढले होते. राज आणि शरद पवारांचे संबंध घट्ट झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा मित्रपक्ष म्हणून मनसे सामील होणार का, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला होता. राज्यातील 20-25 जागा मनसेला देऊन त्या पक्षाला आघाडीत घेण्यात येईल, असा अंदाज त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.

मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज यांचा काहीही करिश्मा दिसून आला नाही. उलट त्यांनी सभा घेतल्या तिथे युतीच्या उमेदवारांनी आणखी मुसंडी मारल्याचे दिसून आले. म्हणूनच निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी मनसेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. राज यांच्या पक्षाने स्वतः निवडणूक लढायला हवी होती, असे ते म्हणाले होते कारण राज यांच्या सभेला आलेले ‘प्रेक्षक’ मतदानाला आलेच नाहीत. उलट राज यांच्या प्रचारावर काँग्रेस – राष्ट्रवादी विसंबून राहिली आणि त्यांचा पराभव झाला. विधानसभेतही हेच व्हावे, असे भाजपला वाटते.

हे कळाल्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी मनसेपासून हातभर अंतर राखण्याची शक्यता आहे आणि राज यांच्या मनसेची किंमत विधानसभेच्या वेळेस कमी होण्याची शक्यता आहे. भाजपला ही गोष्ट नको आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांना आपल्याकडे ओढून भाजपने त्यांची शक्ती खच्ची केली आहे. तरीही वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. अशा वेळेस भाजपविरोधी मते फोडण्यासाठी आणखी एका पक्षाची गरज भासणार आहे. त्यासाठी काही मते खाण्याएवढी मनसे समर्थ होणे शिवसेना आणि भाजपला हवे आहे. राज यांनीही कधी ममता बॅनर्जी तर कधी सोनिया गांधींची भेट घेऊन आपले आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येण्याची शक्यता खूप कमी होती. त्यासाठी खुद्द राज ठाकरेंना डिवचणे भाग होते आणि तेच सरकारने केले होते. भलेही मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला या नोटिशीची माहिती नसल्याचे म्हणत असले तरी त्यांच्या माहितीवाचून ही कारवाई होण्याची शक्यता नाही.

सरकारच्या अपेक्षेप्रमाणे या प्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून 22 ऑगस्ट रोजी ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. स्वतः राज ठाकरे यांनी लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आपल्या अनुयायांना केले आहे. ‘या दिवशी लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. समंजसपणे बंद पाळला तर ठीक नाही तर कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल. राज्यात त्या दिवशी जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल,’ असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मनसेचे कार्यकर्ते पेटून उठणे आणि पक्षाला बळ येणे, ही भाजपच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. याला फ्यूज काढून वीज पुरवठा करणे म्हणतात!

Leave a Comment