मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर अकरा रुग्णांनी गमावली दृष्टी, इस्पितळाचे लायसन्स रद्द


मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथील एका खासगी नेत्ररोग चिकित्सालयामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करविल्यानंतर अकरा वयस्क रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याने राज्य सरकारच्या वतीने या खासगी रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या सर्व रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया आठ ऑगस्टच्या सुमारास झाल्या असून, या सर्वच रुग्णांनी शस्त्रक्रियेनंतर आपली दृष्टी गमावली आहे. काही रुग्णांची दृष्टी संपूर्णपणे गेलेली नसली, तरी त्यांच्या डोळ्यांमध्ये गंभीर संक्रमण झाले असल्याने त्यांची दृष्टी अतिशय अंधुक झाली असल्याचे समजते. आता या रुग्णांना चेन्नई मधील एका नेत्र रुग्णालयामध्ये हलविण्यात आले असून, त्यांच्या डोळ्यांवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजते.

केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याच्या अंतर्गत सुरु असलेल्या ‘नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाईंडनेस’ या उपक्रमाअंतर्गत पंचेचाळीस ते पंच्याऐंशी वयोगटातील चौदा रुग्णांवर इंदूर येथील खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांपैकी अकरा रुग्णांनी शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी दृष्टी अतिशय अंधुक झाल्याने काहीही दिसत नसल्याचे म्हटले. त्यानंतर या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. आरोग्य खात्याच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत इंदूर येथील खासगी नेत्र रुग्णालयामध्ये, एप्रिल ते आठ ऑगस्ट या काळामध्ये ३८६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये अकरा रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याने या इस्पितळाला आपले लायसन्स गमवावे लागले आहे.

दृष्टी गमावलेल्या रुग्णांसाठी राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा करण्यात आली असून इस्पितळातील ऑपरेशन थियेटर सील करण्यात आले आहे. तसेच रुग्णांच्या सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कडक कारवाईही केली जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याचे समजते. या खासगी इस्पितळामध्ये शस्त्रक्रिया करविल्यानंतर रुग्णांना त्याचे दुष्परिणाम भोगावयास लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. नऊ वर्षांपूर्वी देखील या इस्पितळामध्ये शस्त्रक्रिया करवून घेतलेल्या रुग्णांना देखील अश्याच अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

Leave a Comment