पीएमपीएमएलसाठी या कंडक्टरने एकदिवसात जमावले 1 लाख रुपये


आपले काम अतिशय निष्ठेने आणि मेहनतीने केले तर कोणतेही ध्येय सहजसाध्य असते. याचेच उदाहरण अलीकडेच पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) मध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या कुंदन काळे यांनी सर्वांसमक्ष ठेवले आहे. काळे यांची प्रशंसनीय कामगिरी सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे. पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन अशी एकत्रित सुट्टी आल्याने त्या दिवशी परिवहन निगमाद्वारे अतिरिक्त सार्वजनिक बसेसची सोय नागरिकांसाठी उपलब्ध करविण्यात आली होती. याच दिवशी काळे यांची ज्या बसमध्ये ड्युटी होती, त्याच बसमध्ये दिवसभराच्या तिकीटविक्रीमार्फत काळे यांनी तब्बल एक लाख रुपयांहूनही अधिक मिळकत केली.

गेल्या अनेक वर्षांमध्ये केवळ एकाच कंडक्टर मार्फत परिवहन निगमाला इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मिळकत कधीच झाली नव्हती. पंधरा ऑगस्टच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने, त्या दिवशी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक मिळकत परिवहन निगमाला झाली आहे.

काळे यांच्या एकट्याच्या मार्फत तब्बल १,०१,४०२ रुपयांची मिळकत पीएमपीएमएल कडे जमा झाली असून, दिवसाच्या अखेरीस इतर पन्नास कर्मचाऱ्यांच्या मार्फत एकूण पंधरा लाख रुपये परिवहन निगमकडे जमा करण्यात आले. त्यादिवशी झालेल्या मिळकतीमध्ये काळे यांची एकट्याची विक्रमी मिळकत असल्याने पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कुंदन काळे गेली अकरा वर्षे भोसरी डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असून, आजवर त्यांची ड्युटी असलेल्या एकाही बसमध्ये कोणताही प्रवासी विनातिकीट प्रवास करणार नाही याची खबरदारी काळे सातत्याने घेत असतात. बसेसमध्ये ‘वर्किंग अवर्स’ मध्ये किंवा सुट्ट्यांच्या दिवशी जास्त गर्दी असते. अश्यावेळी कंडक्टरला चुकवून तिकीट न काढताच प्रवास करणारे अनेक महाभागही या गर्दीत असतातच. मात्र काळे यांची ड्युटी ज्या बसमध्ये असते, त्या बसमध्ये कितीही गर्दी असली, तरी त्यातील एकही प्रवासी विनातिकीट प्रवास करणार नाही याची खबरदारी काळे घेत असतात.

दिवसाचे आठ तास ड्युटी करून मग त्वरित घरचा रस्ता धरायचा असा आपला स्वभाव नसून, आपली जबाबदारी चोख पार पाडणे आपल्यासाठी जास्त महत्वाचे असल्याचे कुंदन काळे म्हणतात. दररोज पहाटे ड्युटीची वेळ सुरु होण्याआधी अर्धा तास काळे डेपोमध्ये हजर असतात, आणि ड्युटीची वेळ पूर्ण झाल्यानंतरही आपली सर्व जबाबदारी पूर्णपणे पार पाडल्याची खात्री पटल्यानंतरच ते ड्युटी संपवून घरी जात असल्याचे सांगतात. काळे कार्यरत असलेल्या भोसरी डेपोचे व्यवस्थापकही काळे यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल अतिशय संतुष्ट आहेत. केवळ एकाच कंडक्टर मार्फत एकाच दिवसात इतकी मिळकत जमा होणे ही अभिमानाची बाब असून, यापूर्वीही काळे यांनी दोन वेळा पन्नास हजार आणि पंच्याहत्तर हजारांची मिळकत गोळा केल्याचे व्यवस्थापक म्हणतात. महानगर परिवहन निगम, सार्वजनिक परिवहन सेवेवर दररोज लाखो रुपये खर्च करीत असते. त्यामुळे काळे यांचा आदर्श समोर ठेवून जर प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापली जबाबदारी चोख पार पाडली, तर प्रवाश्यांना अधिक उत्तम सेवा पुरवता येईलच, त्याशिवाय परिवहन निगमचे उत्पन्नही वाढेल असे मत पिंपरी चिंचवड महापौरांनी व्यक्त केले.

Leave a Comment