जोफ्राची शाळा घेणाऱ्या रावळपिंडी एक्सप्रेसला युवराज सिंहने रोखले


इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा खंदा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला झालेल्या दुखापतीबाबत आर्चरवर चोहीबाजूने टीका केली जात आहे. दरम्यान आर्चरविरूद्ध पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक ट्विट केले होते, त्याला उत्तर देताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने त्याची खिल्ली उडविली आहे. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यादरम्यान जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सर बॉलमुळे स्मिथला दुखापत झाली, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आर्चरला अख्तरने फटकारले.


शोएब आर्चरची शाळा घेत म्हणाला, जोफ्रा आर्चरकडे शिष्टाचार नाही. आपण टाकलेल्या बाऊन्सरमुळे खेळपट्टीवरच कोसळलेल्या स्मिथची चौकशी करायलाही आर्चर सरसावला नाही. शिवाय, बाऊन्सर हा खेळाचा भाग आहे. पण जेव्हा फलंदाज आपल्या चेंडूच्या आघाताने दुखावतो किंवा खेळपट्टीवर कोसळतो तेव्हा त्याची चौकशी करणे, त्याला सावरणे तसेच त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. मी माझ्या चेंडूमुळे दुखावलेल्या फलंदाजांना सावरण्यासाठी नेहमीच प्रथम धाव घेतली आहे. युवीने यावर अख्तरला ट्रोल केले आणि लिहिले, हो, तुम्ही असे करत होतात! पण फलंदाजाला तुम्ही अजून असे काही चेंडू येतील असे सांगत होता हे देखील विसरु नका.


आर्चरने स्मिथ जखमी झाल्यानंतर त्याची विचारपूस केली नाही. दरम्यान, स्मिथला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत साशंकता आहे. तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात स्मिथने शतकी खेळी केली होती.

Leave a Comment