लोकप्रियतेच्या शिखरावर मोदी – अर्थव्यवस्थेपेक्षा देशभक्ती श्रेष्ठ


आर्थिक आघाडीवर परिस्थिती चिंतेची आहे. ढोबळ देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) किंवा रोजगारविषयक आकडेवारी काळजी करायला लावणारी आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत विविध पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले आहेत. इंडिया टुडे या नियतकालिकाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने ही गोष्ट पुढे आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेपेक्षा देशभक्ती श्रेष्ठ ठरली असल्याचा निष्कर्ष काढायला हरकत नाही.

इंडिया टुडे समूहाने केलेल्या ‘मूड ऑफ दि नेशन’ सर्वेक्षणानुसार, भारताला आतापर्यंत मिळालेले नरेंद्र मोदी हे सर्वश्रेष्ठ पंतप्रधान असल्याचे मत बहुतांश लोकांनी व्यक्त केले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षाही त्यांची लोकप्रियता जास्त आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपैकी 37 टक्के लोकांनी जनतेने मोदींना सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून स्थान दिले. इंदिरा गांधी यांना दुसऱ्या सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून स्थान मिळाले आणि त्यांना 14 टक्के लोकांनी पसंती दिली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 11 टक्के जणांनी पसंती दिली आणि ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले.या तुलनेत केवळ नऊ टक्के लोकांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचे मत व्यक्त केले.

विशेष म्हणजे इंडिया टुडेचे हे सर्वेक्षण कलम 370 रद्द करून काश्मिरची दोन राज्ये कऱण्याच्या सरकारच्या निर्णयापूर्वी घेण्यात आले होते. या निर्णयानंतर जर हे सर्वेक्षण करण्यात आले असते तर हे आकडे आणखी कितीतरी जास्त असते, असे या समूहाने म्हटले आहे. या समूहाच्या वतीने गेल्या अनेक दशकांपासून अशा प्रकारचे सर्वेक्षण नियमितपणे घेण्यात येत आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये घेतलेल्या पाहणीत, 26 टक्के लोकांनी इंदिरा गांधी या सर्वश्रेष्ठ पंतप्रधान असल्याचे मत व्यक्त केले होते आणि 14 टक्के जणांनी मोदींना सर्वश्रेष्ठ पंतप्रधानाचा मान दिला होता. आज ही परिस्थिती बदलली आहे.

मोदी सरकारने काश्मिरच्या केलेल्या नाकेबंदीवर अनेकांनी टीका केली होती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या पंतप्रधानांनी काश्मिरला वेठीस धरल्याची टाकी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केली होती. मात्र त्यांच्या या धाडसी पावलाचे त्यांच्या समर्थकांनी तर स्वागत केलेच, पण काही राजकीय विरोधकही त्यांना पाठिंबा देत आहेत. मोदी सरकारचे कट्टर विरोधक असलेले माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणाचे कौतुक केले, ते यासाठीच.

मोदींचे आणखी एक कट्टर विरोधक आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही मोदींचीच भाषा बोलू लागले आहेत. कलम 370 मागे घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला आम आदमी पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

त्यानंतर केजरीवाल यांनी पुढच्या वर्षीपासून सरकारी शाळांमध्ये ‘देशभक्ती अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. “आम्ही निर्णय घेतला आहे की देशभक्त नागरिकांचा वर्ग उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे,” असे केजरीवाल म्हणाले. “प्रथम, प्रत्येकाने आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे, आपल्या देशातील समस्या सोडवण्याच्या बाबतीत जबाबदारीची भावना असणे आवश्यक आहे आणि राष्ट्रासाठी काहीही त्याग करण्यास तयार असले पाहिजे,” असे ते म्हणाले. ही सर्व मोदींचीच शब्दावली आहे.

जागतिक माध्यमांनीही या घडामोडीची दखल घेतली आहे. टीम सुलिव्हान या अमेरिकी लेखकाने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेसाठी एक लेख याच विषयावर लिहिला आहे. मोदींनी काश्मिरची नाकेबंदी केली आहे आणि भारतीय लोक त्याबद्दल त्यांच्यावर प्रेम करतात, अशा आशयाचे शीर्षक त्यांनी या लेखाला दिले आहे.

“मोदींनी अत्यंत काळजीपूर्वक आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे. ते पत्रकारांशी क्वचितच बोलतात. मोदी हा एका चहा स्टॉल चालवणाऱ्याचा मुलगा आहे आणि आज ते कुशल वक्ते बनले आहेत. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता नाही,” अशी निरीक्षणे सुलिव्हान यांनी नोंदवली आहेत.
पृथ्वीवरील नंदनवन म्हटले जाणारे काश्मिर खोरे सध्या सैनिकांनी वेढले आहे आणि काटेरी तारांच्या कुंपण्यांनी बंदिस्त झाले आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून बंद असलेल्या फोन लाईन आणि इंटरनेट आता सुरू होत आहेत.अटक किंवा स्थानबद्ध केलेल्या राजकारण्यांची सुटका होत आहे. या सगळ्या गोष्टींपुढे अर्थव्यवस्थेची चिंता विसरायला मोदींनी भाग पाडले आहे एवढे नक्की.

Leave a Comment