गंगेत घोडे न्हाले – कर्नाटकाला अखेर मिळणार मंत्री


तब्बल 22 दिवस एकहाती सरकार चालवल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना सहकारी मिळणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची भरती करण्यासाठी येडियुरप्पा यांना हिरवा कंदील मिळाला असून मंगळवारी या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी येडियुरप्पा यांना शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून परवानगी मिळाली. मंगळवारी सकाळी विधानसभेच्या सभागृहात भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्याच दिवशी दुपारनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे ट्विट स्वतः येडियुरप्पांनी केले आहे. त्यामुळे संभाव्य मंत्र्यांना उमेद आली असल्यास नवल नाही.

आपण पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करू आणि राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रुप देऊ, असे येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात 34 जणांना घेता येऊ शकते मात्र त्यातील केवळ 13 जागा आधी भरण्यात येतील. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदे भरण्यात येतील, असे भाजपच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र त्यांच्या सोबत नक्की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे यावर भाजपमध्ये एकमत होऊ शकले नव्हते. त्यामुळे सुमारे महिनाभर एकटे मुख्यमंत्रीच राज्याचा गाडा हाकत होते. यापूर्वीही येडीयुरप्पा दिल्लीला गेले होते परंतु याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. याचे कारण म्हणजे राज्यातील जातीचे समीकरण.

राज्यात लिंगायत हा भाजपचा सर्वात मोठा आधार आधारवर्ग असून लिंगायत समुदायाचे 34 आमदार आहेत. स्वतः येडियुरप्पा हेही लिंगायत आहेत. लिंगायतांच्या खालोखाल आमदारांची संख्या वोक्किलिगा समुदायाची आहे. आर. अशोक, डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, सी.टी. रवी आणि एस.आर. विश्वनाथ हे या समुदायाचे प्रमुखे नेते आहेत. त्यांच्या सोबतच दलित, अनुसूचित जमाती, ब्राह्मण आणि इतर मागासवर्गीय समाजातील आमदारांनाही जागा द्यावी लागणार आहे. त्यामुळेच “सर्व जाती व प्रांत विचारात घेतले जातील आणि त्यांना मंत्रिमंडळात समान वाटा देण्यात येईल,” असे येडियुरप्पांनी स्पष्ट केले होते.

लिंगायत समुदायातील जगदीश शेट्टर, उमेश कट्टी, मधुस्वामी, बसवराज बोम्मई, व्ही सोम्ना आणि शशिकला जोल्ले; दलित समाजातील गोविंद करजोल आणि एस अंगारा; वाल्मिकी नायक समाजातील बी श्रीरामुलू (मोलाक्कनुरु), शिवनगौडा नायक आणि बालाचंद्र जारकिहोली; बिल्लावा समाजातील एमएलसी कोटा श्रीनिवास पुजारी; वोक्किलिग समुदायातील अशोक आणि ब्राह्मण समुदायातील सुरेश कुमार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

इतकेच नाही तर मागील सरकारमधील ज्या आमदारांनी बंडखोरी करून भाजपच्या या सरकारला सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला त्यांनाही त्यांचा वाटा द्यावा लागणार आहे. काँग्रेस – धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारमधील त्या 17 आमदारांनाही सरकारमध्ये सामावून घ्यावे लागणार आहे. पूर्वीच्या विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरविले असले, तरी त्यांनी या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांना जागा मिळू शकते.

भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा उशीर झाल्याने कॉंग्रेस आणि जेडीएस पक्षांनी भाजपवर जोरदार टीका करणे शक्य होते. येडियुरप्पा हे एका माणसाचे सरकार चालवत असल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेषतः राज्यात आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर या टीकेला अधिक धार आली होती. पूर आणि मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रभारी मंत्री नसल्याबद्दल मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि भाजपला चोहोबाजूने टीका सहन करावी लागली होती. “येडियुरप्पा एकपात्री अभिनय करीत आहेत. हा वन-मॅन शो आहे.एकटा माणूस इतका भार कसा हाताळू शकतो, हे मला कळत नाही. हे मानवासाठी अशक्य आहे. फक्त एकच माणूस आणि मंत्रिमंडळ नाही, असे कोणतेही सरकार नाही,” असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते. येडियुरप्पा यांनी काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी जे समर्पण दाखवले होते, ज्या तळमळीने काम केले होते ते स्वतःचे सरकार स्थापण्याच्या बाबत दाखविले नाही. सरकार म्हणजे केवळ मुख्यमंत्री नव्हे तर मंत्रिमंडळ सुद्धा असते, असेही ते म्हणाले.

आता येडियुरप्पांनी अखेर सहकाऱ्यांची निवड करून मंत्रिमंडळासाठी मुहूर्त शोधला आहे आणि ही टीका शमवली आहे. तूर्तास तरी गंगेत घोडे न्हाले म्हणायचे!

Leave a Comment