राज ठाकरे हाजिर हो…


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली असून येत्या 22 ऑगस्टला ईडी कार्यालयात यासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही याप्रकरणी ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे सर्वकाही सरकार सूडबुद्धीने करत असून याबाबत सरकार विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर ईडीने खुशाल चौकशीला यावे, मला फरक पडत नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावरील एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.

मागील काही महिन्यांपासून बुडीत निघालेली ‘आयएल अँड एफएस’ कंपनी संकटात आहे. अनेक ठिकाणी या कंपनीने गुंतवणूक केली आहे. यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल. आयएल अँण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती. पण बऱ्याच तक्रारी कंपनीबाबत असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील एका कंपनीला आयएल अँण्ड एफएसने मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभे करण्यासाठी गुंतवणूक केली होती. या व्यवहाराशी आयएल अँण्ड एफएसचा कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.

सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज उन्मेष जोशी यांच्या कंपनीला दिले होते, कंपनीला ते चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अँण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. आयएल अँण्ड एफएसने साधारण 2011 साली उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. पण 2017 साली या व्यवहाराबाबतची नोंदणी करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Comment