अकबरुद्दीनच, पण ओवैसी नव्हे, सैय्यद!


दोन अकबरुद्दीन, पण केवढा फरक! एक अकबरुद्दीन हैद्राबादच्या मुस्लिम वस्त्यांमध्ये अशिक्षित लोकांसमोर प्रक्षोभक बोलून आपली राजकीय पोळी भाजून घेणारा. दुसरा अकबरुद्दीन जागतिक व्यासपीठावर भारताची बाजू समर्थपणे मांडून पाकिस्तानचे मुस्काट फोडणारा. जमीन-अस्मानाचे अंतर असलेल्या या दोन अकबरुद्दीनची तुलना करण्याचा मोह म्हणूनच नेटकऱ्यांना आवरला नाही.

काश्मिर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक बंद खोलीत झाली. या बैठकीतून पाकिस्तानच्या हाती तर काही लागले नाहीच, उलट बैठकीनंतर त्याची आणखी फजिती झाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच पाकिस्तानी पत्रकारांच्या दिशेने हात पुढे करून प्रतीकात्मक सद्भावनाही प्रदर्शित केली. चीन व पाकिस्तानी प्रतिनिधींच्या उद्धट वर्तनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही वागणूक कौतुकाचा विषय ठरली.

सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य असलेल्या चीनच्या आग्रहावरून ही शुक्रवारी अनौपचारिक बैठक सुमारे तासभर चालली. यानंतर संयुक्त राष्ट्रातील चीनचे राजदूत झांग जुन आणि पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेच्या मंचावरून एकामागोमाग एक माध्यमांना संबोधित केले. दोघांनीही पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता तेथून काढता पाय घेतला.

त्यानंतर अकबरुद्दीन हे काश्मिर व कलम 370 बाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी मंचावर आले. चिनी व पाकिस्तानी राजदूतांच्या उलट ते आपले निवेदन केल्यानंतर तिथेच थांबले आणि पत्रकारांना प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यांनी एकूण पाच प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दाखवली व त्यातील पहिले तीन तीन प्रश्न पाकिस्तानी पत्रकारांकडून घेतले.

भारत पाकिस्तानशी चर्चा करण्याकरिता सहमत आहे का, असा प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारला असता अकबरुद्दीन म्हणाले, “दोन देश जेव्हा एकमेकांशी संपर्क करतात तेव्हा काही सामान्य राजनयिक पद्धती असतात. हीच रूढी आहे. मात्र सामान्य राष्ट्र प्रगती व आपली लक्ष्य साध्य करण्यासाठी दहशतवादाचा मार्ग चोखाळत नाहीत. दहशतवाद जोपर्यंत राहील तोपर्यंत कोणतीही लोकशाही चर्चा स्वीकारणार नाही. दहशतवाद रोखा, संवाद सुरू करा.”

एका ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने विचारले, “तुम्ही पाकिस्तानशी संवाद केव्हा सुरू कराल?”

तेव्हा मंचावरून उतरताना सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, “याची सुरूवात मी तुमच्या जवळ येऊन आणि तुम्हा तिघांशी हस्तांदोलन करून करतो.’
अकबरुद्दीन पुन्हा त्या दोन पाकिस्तानी पत्रकारांकडे गेले आणि स्मितहास्य करून त्यांच्याशी हस्तांदोलन केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व जणांनी त्यांच्या या कृतीची प्रशंसा केली. त्याच प्रमाणे सोशल मीडियावरील अनेक जणांनीही त्यांची तारीफ केली. हे कौतुक केवळ त्यांनी पाकिस्तानला योग्य चपराक लगावल्याबद्दलच नव्हती, तर आपल्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्याशीही त्यांची तुलना झाली.

‘मजलिस-ए-इत्तेहादूल-मुसलमीन’चे (एमआयएम) आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे आपल्या आगखाऊ भाषणांसाठीच ओळखले जातात. विशेषतः “हिंदू 100 कोटी आहेत, मुसलमान 25 कोटी आहेत. देशातील पोलीस फक्त 15 मिनिटे बाजूला हटवा आणि होऊन जाऊ द्या. बघू या कोणामध्ये किती दम आहे ते,” असे वक्तव्य 2013 मध्ये त्यांनी केले होते. हेच वक्तव्य त्यांनी गेल्या महिन्यातही केले होते. ‘फक्त 15 मिनिट पोलीस हटवा आणि मुसलमानांची ताकद बघा,’ असे ते म्हणाले होते. तसेच धर्मांधांच्या झुंडीचे बळी होण्यापेक्षा ‘शेर’ व्हा असा सल्लाही त्यांनी मुसलमानांना दिला होता. त्याच प्रमाणे तेलंगाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अश्लाघ्य टीका केली होती. मोदी यांच्या कानातून रक्त काढण्याची अकबरुद्दीन ओवैसी यांनी धमकी दिली होती. मुस्लिम असल्यामुळेच आम्हाला टार्गेट केलं जातंय, अशी त्यांनी वारंवार तक्रार केली आहे.

अशा आगलाव्या नेत्याने सय्यद अकबरुद्दीन यांच्याकडून धडा घ्यावा, असे देशप्रेमी नागरिकांना वाटले नसते तरच नवल. याच भावनेचे पडसाद ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील व्यासपीठांवरही उमटले. म्हणूनच ‘जेव्हा नशीब तुम्हाला अकबरुद्दीन बनवते तेव्हा सय्यद व्हा, ओवैसी नव्हे,’ अशा प्रकारचे संदेश दिले गेले. अकबरुद्दीनच, पण ओवैसी नव्हे , सैय्यद! किती फरक आहे हा!

Leave a Comment