आम्ही विकाऊ नाही – एका बेटाची ट्रम्पना चपराक


अमेरिकेचा अध्यक्ष ही जगातील सर्वशक्तिमान व्यक्ती मानली जाते. या अध्यक्षाच्या मनात आले तर पृथ्वीला चुटकीसरशी संपवू शकतो, एवढे बळ त्याच्या हातात असते. मात्र म्हणून त्याने सगळ्या जगावर मालकी गाजवायची नसते आणि दुसऱ्या देशांच्या, खासकरून छोट्या देशांच्या, अस्तित्वाचा आदर केला पाहिजे. जेव्हा असे होत नाही तेव्हा हे छोटे देशही अध्यक्षांना त्यांची पायरी दाखवून देऊ शकतात. ग्रीनलँड या बेटाने हे दाखवून दिले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील ग्रीनलँड हे सर्वात मोठे बेट विकत घेण्याची इच्छा आहे. सध्या हे बेट डेन्मार्कच्या मालकीचे आहेट्रम्प यांनी ग्रीनलँड विकत घेण्यामध्ये अनेकदा स्वारस्य दाखविले आहे. याबाबतच्या शक्यता तपासून पाहाव्या, असे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे, असे वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकी वृत्तपत्राने म्हटले आहे. ट्रम्प हे लवकरच डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत मात्र सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यात ग्रीनलँडचा खरेदीचा मुद्दा ते मांडतील किंवा हे बेट विकत घेण्याचा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे, असे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. तथापि या विषयावर ट्रम्प यांच्या सहाय्यकांमध्ये दोन गट पडले आहेत. यातील एका गटाने ठोस आर्थिक रणनीती म्हणून त्याचे कौतुक केले तर काहींनी ती अव्यवहार्य कल्पना म्हणून फेटाळून लावली. आर्क्टिक भागात मोडणाऱ्या या भागात आपल्या सैन्याची संख्या वाढविण्याची ट्रम्प यांची योजना असावी, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. या कल्पनेबाबत ट्रम्प किती गंभीर आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण आतापर्यंत झालेल्या चर्चेवर परराष्ट्र विभाग किंवा व्हाईट हाऊस यांपैकी कोणीही भाष्य केलेले नाही.

मात्र अमेरिकेत एवढी चर्चा होत असताना ग्रीनलँडच्या शासनाने या सर्व कल्पनांवर पाणी फेरले. “ग्रीनलँड विक्रीसाठी नाही,” अशी थेट घोषणा या बेटाच्या सरकारने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून केली. ग्रीनलँडच्या परराष्ट्र मंत्रालयाने तर ‘आम्ही व्यवसायासाठी खुले आहोत, विक्रीसाठी नाही,’ अशा शब्दांत ट्रम्पना सुनावले. “खनिजे, शुद्ध पाणी आणि बर्फ, मासे, सागरी खाद्य, पुनर्नवीकरणीय ऊर्जा अशा मौल्यवान संसाधनांनी ग्रीनलँड समृद्ध आहे आणि साहसी पर्यटनासाठी ही एक नवी सीमा आहे,” असे या खात्याने ट्विटरवर म्हटले आहे.

डेन्मार्कच्या राजकारण्यांनी तर ट्रम्पना वेड्यातच काढले. ” की ते (डोनाल्ड ट्रम्प) या कल्पनेवर काम करीत आहेत, हे जर सत्य आहे तर ते वेडे झाले आहेत याचा हा अंतिम पुरावा आहे. डेन्मार्क आपल्या देशातील 50 हजार नागरिकांना अमेरिकेला विकू शकेल ही कल्पना अगदीच वेडगळपणाची आहे,” असे डॅनिश पीपल्स पार्टी या उजव्या विचारसरणीचे संसद सदस्य सोरेन एस्पर्सन एका डॅनिश वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले. माजी पंतप्रधान लार्स लोके रास्मुसेन यांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळला. “हा एप्रिल फूल डेचा विनोद असावा…पण तो पूर्णपणे चुकीच्या वेळेस केला आहे,” असे ते म्हणाले.

वास्तविक एखाद्या अमेरिकी नेत्याने ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1946 मध्येही अमेरिकेने डेन्मार्कला हा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी अमेरिकेने 10 कोटी डॉलर सोन्याच्या स्वरूपात देऊ केले होते आणि त्या बदल्यात डेन्मार्कला अलास्कात जागा देऊ केली होती. मात्र ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. उलट डॅनिश नेत्यांना तो एक धक्काच होता. दुसरीकडे 1917 मध्ये डेन्मार्कने अमेरिकेला तेव्हा डेन्मार्कच्या ताब्यात असलेली वेस्ट इंडीजची बेटे 20 लाख डॉलर्सला विकल्या होत्या. नंतर या कॅरिबियन बेटांचे नाव बदलून ‘युनायटेड स्टेट्स व्हर्जिन आयलँड्स’ असे करण्यात आले.

ग्रीनलँड बेटाचा तीन चतुर्थांश भाग नेहमीच बर्फाच्या चादरीखाली झाकलेला असतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागरांच्या दरम्यान हे बेट असून तेथे स्थानिक शासन चालते. सध्या हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश आहे. केवळ तेथील परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि चलनावर डेन्मार्कचे नियंत्रण आहे. वीस लाख चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ग्रीनलँडमध्ये केवळ 57 हजार लोक राहतात. ग्रीनलँडमधील नैसर्गिक संसाधन आणि त्याचे मोक्याचे स्थान यांचा विचार करून अमेरिकेला त्यात रूची आहे. परंतु ग्रीनलँडवासियांचा निर्धार पाहिला तर अमेरिकेच्या मनातील मांडे मनातच राहतील, यात शंका नाही.

Leave a Comment