विशालकाय बर्गर खाऊन संपविणाऱ्यासाठी पबच्या वतीने अजब ‘ऑफर’


उत्तर पूर्वी इंग्लंडमधील काउंटी डरहॅम येथे असलेले ‘जॉर्ज पब अँड ग्रील’ हे रेस्टॉरंट चविष्ट बर्गर्ससाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी या रेस्टॉरंटमध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रेस्टॉरंट काही काळ नूतनीकरणाच्या निमित्ताने बंद होते. पण अलीकडेच हे रेस्टॉरंट पुन्हा ग्राहकांच्या सेवेसाठी खुले झाले असून, येथील चविष्ट बर्गर्स चाखण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात. या रेस्टॉरंटने आता नवे रूप धारण केले आहेच, पण त्याचसोबत आपल्या ग्राहकांसाठी एक नवी, आणि काहीशी अजब ऑफरही आणली आहे.

या रेस्टॉरंटने आपल्या ग्राहकांसाठी नवे ‘बर्गर चॅलेंज’ योजले आहे. यामध्ये रेस्टॉरंटमध्ये तयार केला जाणारा ‘बिग बेन नंबर टेन’ नामक महाकाय बर्गर एका बैठकीत संपविण्याचे आव्हान या रेस्टॉरंटने आपल्या ग्राहकांसमोर ठेवले आहे. एकावर एक असे दहा बर्गर रचून, त्यावर भरपूर (साठ औंस) चीज आणि प्रत्येक बर्गरवर बेकनचे थर (एकूण पंचवीस बेकन रॅशर्स) रचून हा विशालकाय बर्गर बनविला जात असून, २८.९५ पाउंड्स इतकी या बर्गरची किंमत आहे. या बर्गर सोबत साईड डिश म्हणून फ्रेंच फ्राईजही दिल्या जातात. या बर्गरचे एकूण वजन तब्बल दीड किलो असून, केवळ एका ‘बिग बेन’ बर्गरमध्ये तब्बल बारा हजार कॅलरीज आहेत ! तसेच ज्यांची इच्छा असेल, त्यांना अतिरिक्त पैशांच्या बदल्यात ‘एक्स्ट्रा’ चीज आणि बेकन या बर्गरवर घालून घेण्याची मुभाही रेस्टॉरंटच्या वतीने देण्यात आली आहे.

असा हा विशालकाय बर्गर एकाच व्यक्तीने एकाच बैठकीत संपवायचे आव्हान रेस्टॉरंटने येथे येणाऱ्या ग्राहकांना दिले आहे. ह बर्गर एका बैठकीत संपविणाऱ्याला आजारपण, कदाचित हृदयविकाराचा झटका येऊन मरण जरी आले, तरी त्याचीही तयारी रेस्टॉरंटने ठेवली आहे. जर एखाद्याने हा विशालकाय बर्गर एका बैठकीत संपविला, आणि त्यानंतर त्याला मरण आले, तर मरणोपरांत त्या व्यक्तीच्या कबरीवर लावण्यात येणाऱ्या ‘ग्रेव्हस्टोन’चा खर्च रेस्टॉरंटच्या वतीने करण्यात येणार आहे ! म्हणूनच हा बर्गर एका बैठकीत संपविण्याचे रेस्टॉरंटने समोर ठेवलेले आव्हान ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारीवर स्वीकारण्याच्या बाबतीत रेस्टॉरंट आग्रही असल्याचे रेस्टॉरंट व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच हा बर्गर संपवीत असताना जर एखाद्याची तब्येत बिघडली, तर त्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने पाचशे पाउंड्सची रक्कम त्या व्यक्तीला देण्यात येणार असल्याचेही रेस्टॉरंटच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment