पाण्यात प्लॅस्टिक, मिठात प्लॅस्टिक…आणि आता पाऊसही प्लॅस्टिकचा!


पाण्यात प्लॅस्टिक, मिठात प्लॅस्टिक…आणि आता पाऊसही प्लॅस्टिकचा!हवेच्या प्रदूषणामुळे कारणे आम्लाचा पाऊस म्हणजे आम्लवर्षा किंवा ॲसिड रेन होण्याचे प्रकार आतापर्यंत ऐकिवात होते. मात्र आता पावसाच्या माध्यमातून चक्क प्लॅस्टिकचा वर्षाव होत असून त्यामुळे मानवजातीसमोर आणखी एक संकट उभेर राहिले आहे.

अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केलेल्या संशोधनातून हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हे आणि इंटेरियर डिपार्टमेंट म्हणजे गृहखात्याच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. पावसाद्वारे कोसळणारे हे प्लॅस्टिक साध्या डोळ्यांनी दिसत नाही मात्र सूक्ष्मदर्शक दुर्बिण लावलेल्या डिजिटल कॅमेरांनी केलेल्या तपासणीत त्यांना पावसात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळले.

डेन्व्हर आणि बुल्डर (कोलोरॅडो) येथे या शास्त्रज्ञांनी हे नमुने गोळा केले. ‘इट इज रेनिंग प्लॅस्टिक’ असे या शीर्षकाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गंमत म्हणजे हे कण वेगवेगळ्या रंगांचे होते. यात सर्वाधिक कण हे निळ्या रंगातील होते तर त्यानंतर लाल, चंदेरी, जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि अन्य रंगांच्या कणाचा समावेश होता, असे त्यात म्हटले आहे.

या सर्वेक्षणात जे नमुने घेण्यात आले त्यांपैकी 90 टक्के नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकच्या फायबर (तंतू) स्वरूपात हे प्लॅस्टिकचे कण होते. ग्रामीण भागांतील नमुन्यांच्या तुलनेत शहरी भागांमधील नमुन्यांमध्ये जास्त प्रमाणात प्लॅस्टिक आढळले. तसेच समुद्रसपाटीपासून अगदी 10,400 फूट उंचीवर घेतलेल्या डोंगराळ भागांतील नमुन्यांतही प्लॅस्टिकचे कण आढळून आले. हे प्लॅस्टिक कुठून येत आहे, हे संशोधकांना अद्याप ठरवता आलेले नाही. मात्र जगभरात प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या किती गंभीर बनली आहे, याचे उदाहरण म्हणून याकडे बोट दाखवले जात आहे.

जेवढे प्लॅस्टिक आपण पचवू शकतो त्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक प्रत्येक ठिकाणी आहे, असे या संशोधनात सामील झालेल्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आता ते पर्यावरणाचा भाग बनले आहे. प्लॅस्टिकचा 90 टक्के कचरा रिसायकल होत नाही आणि हळूहळू त्याचे सूक्ष्म तुकडे पडत जातात. अगदी आपण कपडे धुतो तेव्हा त्यातूनही प्लॅस्टिक फायबर सुटे होत जाते. प्लॅस्टिकचे कण वातावरणात मिसळत जातात. पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा हेच प्लॅस्टिक त्या वाफेत सामावून जाते आणि पावसाच्या पाण्यासह ते पुन्हा पृथ्वीवर येते. वाहत्या पाण्यासोबतच ते नदी, सरोवर, समुद्र आणि भूजलात समाविष्ट होते.

या प्लॅस्टिकचा मनुष्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होता, याबाबत शास्त्रज्ञ अनभिज्ञ आहेत. मात्र या संदर्भात अनेक संशोधन सुरू आहेत. यापूर्वी दक्षिण फ्रान्समध्येही पावसाच्या सरींमध्ये प्लॅस्टिकचे कण आढळले होते. तसेच लोक आपल्या जेवणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दर आठवड्याला पाच ग्रॅम प्लॅस्टिक पोटात ढकलत आहेत, असेही यापूर्वी एका संशोधनात आढळले होते. प्लॅस्टिक कचऱ्याचे कोट्यवधी तुकडे समुद्रात वाहतात आणि त्यांच्यामुळे मासे आणि इतर प्राणी मरतात, असेही शास्त्रज्ञांना आढळले. गेल्या वर्षी एका संशोधनात मिठामध्येही प्लॅस्टिक कण आढळले होते. समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या कचऱ्यातून हे कण मिठामध्ये गेल्याचा निष्कर्ष त्यावेळी काढण्यात आला होता. विविध कंपन्यांच्या मिठाच्या नमुन्यात प्लास्टिकचे 626 सूक्ष्म कण आढळले होते आणि त्यात 63 टक्के प्लास्टिकचे कण आढळले होते.

एकीकडे शास्त्रज्ञ हा धोक्याचा इशारा देत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांना प्लॅस्टिकचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. मंगळवारी पेनसिल्व्हानिया येथे प्लॅस्टिक उत्पादन कारखान्यात त्यांनी हे वक्तव्य केले. जग प्लॅस्टिक वेगाने वेढले जात असताना तुम्ही असे आवाहन करता, याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावेळी त्यांनी उलट भारत आणि चीनवरच खापर फोडले.

“आपल्याकडे आशिया, चीन आणि इतर अनेक देशांकडून प्रचंड प्लॅस्टिक येत आहे. ते आपले प्लॅस्टिक नाही. हे प्लॅस्टिक महासागरात तरंगत असलेले आणि इतर विविध महासागरांमध्ये तरंगत असलेले प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक वाईट नाही मात्र त्याचे काय करावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. मात्र इतर देश त्यांच्या प्लॅस्टिक वापराबद्दल काळजी घेत नाहीत आणि ते दीर्घकाळापासून बेफिकीरी बाळगत आहेत. आपल्याकडे तरंगत येणारे प्लॅस्टिक हे चीनसहित इतर ठिकाणांहून येत आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

असा निर्बुद्धपणा आणि बेजबाबदारपणा असल्यावर प्लॅस्टिकची समस्या इतक्यात तरी दूर व्हायचे नाव नको!

Leave a Comment