नरेंद्र मोदींपेक्षा कट्टर मोदी समर्थक!


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कट्टर राष्ट्रवादी असल्याचे मानल जाते. ते स्वतःही आपण राष्ट्रवादी, त्यातही हिंदू राष्ट्रवादी, असल्याचे अभिमानाने सांगतात. पंतप्रधान होण्यापूर्वी आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेली मुलाखत आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यात त्यांनी शिताफीने आपला हिंदू राष्ट्रवाद उलगडून दाखवला होता. “मी हिंदू आहे आणि राष्ट्रवादीही आहे. त्यामुळे मी हिंदू राष्ट्रवादी आहे, यात काहीही चूक नाही,” असे त्यांनी म्हटले होते. मोदी सरकारने पाकव्याप्त काश्मिरात घुसून पाकिस्तानपोषित दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे, पाकिस्तानी सैनिकांना ठार मारणे, सर्जिकल स्ट्राईक करणे अशी पावले उचलल्यामुळे त्यांच्यामागे राष्ट्रवादी विचारांचा एक मोठा वर्ग उभा राहिल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते.

राष्ट्रीय राजकारणात पुढे आल्यापासून किंवा त्याआधीही मोदी यांच्या बाबतीत बोलणारे दोनच गट दिसतात -एक त्यांचे कट्टर विरोधी व दुसरे त्यांच्या बाजूने बोलणारे. मोदींबद्दल पूर्णपणे निष्पक्ष असलेला म्हणजे मोदींच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारा तर वाईट कामांसाठी त्यांच्यावर टीका करणारा असा वर्ग अभावानेच आढळतो म्हणतात. या ध्रुवीकरणाच्या मागे मोदी यांची प्रखर राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद किंवा खंबीर धोरण आहे असेही म्हणतात.

मात्र मोदींच्या या ‘कठोर देशभक्ती’पेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये अधिक कट्टरता आहे, हे वारंवार दिसून येते. याचे ताजे उदाहरण म्हणजे खुद्द मोदींनी मागविलेल्या सूचना व कल्पनांवर त्यांच्या पाठिराख्यांनी केलेले मतप्रदर्शन. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून पंतप्रधान भाषण करतात.
नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा, यासाठी मोदींनी लोकांच्या सूचना मागवल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून 20 हजार सूचना मोदींना मिळाल्या आहेत. त्यातून देशाच्या नागरिकांच्या मनाचा अंदाज येतो.

नमो ॲपवरून या कल्पना मागवण्यात आल्या होत्या. त्यातून एवढे लक्षात यायला हरकत नाही, कि जम्मू – काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर देशात राष्ट्रवादाला उधाण आले आहे. अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुस्ती असूनही लोकांनी त्याबाबत फारसे विचार मांडलेले नाहीत. मोदींनी अॅपवरून आपले विचार मांडण्याचे आवाहन 18 जुलैला केले होते. तेव्हापासून स्वच्छता, नोकऱ्यांमधील आरक्षण, शिक्षण, आरोग्य, जमावांकडून हिंसाचार, महापूर, भ्रष्टाचार, राष्ट्रभक्ती, नव्या भारताचा विचार आणि सोशल मीडिया यांसारख्या विषयांवर विचार मांडले होते. मात्र 5 ऑगस्ट रोजी राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मिर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला. ॲपवर आलेल्या सूचनांमध्ये त्याचा जणू पूर आला आहे.

अनेक जणांनी 5 ऑगस्टला काश्मिर दिवस म्हणून जाहीर करण्याची सूचना केली आहे. कलम 370 रद्द करण्याचे विधेयक याच तारखेला राज्यसभेत सादर करण्यात आले होते. काश्मिर दिवस साजरा केल्यास लोक दरवर्षी काश्मिरच्या भारतातील एकीकरणाचा आनंद साजरा करू शकतील, असे त्यांचे मत आहे. ”यावर्षी तिरंगा ध्वजारोहण लाल किल्ल्यावर नव्हे तर लाल चौकात व्हावे, ही जम्मू – काश्मिरच्या लोकांची इच्छा आहे,” असे एका व्यक्तीने म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी 15 ऑगस्टला श्रीनगरला जायला हवे, अशीही एक सूचना आली होती. ”तुम्ही आहात तर शक्य आहे. कृपया पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरबाबत आपली योजना सांगावी,” अशीही एक सूचना आली आहे.

भारत आणि पाकिस्तानने आपापल्या सीमा बाजूला सारून पुन्हा एक व्हावे, अशीही धाडसी सूचना एकाने केली आहे. तसेच लोकांनी काश्मिरमध्ये कमीत कमी तीन-चार मोठ्या योजना आणि स्थानिक युवकांना आरक्षण देण्याची घोषणा करण्याचीही सूचना केली आहे. ”तुमच्या नेतृत्वाखाली जगाने पहिल्यांदाच भारताचे सामर्थ्य मान्य केले आहे. आम्हाला कोणीही सहजपणे धमकावणी देऊ शकत नाही, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे,” असे एका संदेशात म्हटले आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षीत आहे अशी जनभावना आहे, हे त्यातून दिसून येते.

प्रत्यक्षात मोदींनी काश्मिरचे विवेचन केले असले, तरी पाकिस्तानबाबत त्यांनी हात राखूनच वक्तव्य केले. अगदी पाकिस्तान हा शब्दसुद्धा त्यांनी उच्चारला नाही. त्यामुळे स्वतः मोदी सावधगिरीने चालत असल्याचे दिसत आहे, तर त्यांचे पाठीराखे मात्र जोरात असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment