एकाच चित्रपटात तब्बल 25 भूमिका साकारणार ‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टार


आपल्या अभिनयासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चियान विक्रम’ केवळ दक्षिण सिनेसृष्टीतील चाहत्यांमध्येच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे. तो विविध चित्रपटांत विविध व्यक्तिरेखा साकारताना स्वतःमध्ये एवढे बदल करतो, की 2 ते 3 कॅरेक्टर्स त्याच्या एका चित्रपटातच पाहिल्याची गंमत प्रेक्षकांना मिळते. तो देशभरातील चाहत्यांचा ‘अपरिचित’ या चित्रपटामुळे लाडका बनला आहे. त्याने या चित्रपटात साकारलेल्या ‘अम्बी’, ‘रेमो’ आणि ‘अपरिचित’ या तीन व्यक्तिरेखांमध्ये एकाचवेळी तो एवढा वेगवेगळा वाटायचा की त्यामुळे चक्क प्रेक्षक हैराण व्हायचे.

त्याला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर त्याने ‘I’ या चित्रपटातही पहिलवान, मॉडेल, हिंस्त्र श्वापद आणि कुबड आलेल्या व्यक्तीच्या आव्हानात्मक भूमिका केल्या होत्या. त्याने ‘इरू मुगन’ या चित्रपटात पोलीस ऑफिसर आणि गे व्हिलन अशा दोन्ही भूमिका केल्या होत्या.

आपल्या भूमिकांमध्ये विविध वैविध्य जपणाऱ्या विक्रमचे चाहते नेहमीच आता पुढच्या चित्रपटात तो कोणती वैशिष्ट्यपूर्ण भूमिका करणार याबद्दल उत्सुक असतात. तर आता पुन्हा एकदा विक्रम नव्या आव्हानासाठी तयार झाला आहे. चियान विक्रम आगामी चित्रपटात दोन किंवा 3 नव्हे, तर चक्क 25 भिन्न भिन्न भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय ज्ञानमुथू असतील. या चित्रपटाची निर्मिती ललिथ कुमार आणि व्हायकॉम 18 मिळुन करत आहेत. संगीतकार ए.आर. रहमान या चित्रपटाची गाणी संगीतबद्ध करणार आहेत.

एकाच चित्रपटात 25 विविध भूमिका साकारण्याचा जागतिक विक्रम हा विक्रमच्या नावावर जमा होईल. हा विक्रम याआधी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता कमल हासनच्या नावावर आहे. कलम हासन यांनी ‘दशावताराम’मध्ये 10 विविध भूमिका केल्या होत्या. याआधीही शिवाजी गणेशन यांनी ‘नवरात्र’ तामिळ चित्रपटात नऊ भूमिका साकारल्या होत्या.

Leave a Comment