मुंबई – सांगली, सातारा आणि कोल्हापूरात ओढावलेल्या महापुरमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेकांना या महापुरात आपले प्राण गमवावे लागले होते. त्या ठिकाणचे पाणी आता ओसरायला लागले असून मदत कार्याने जोर धरला आहे. त्यातच सर्वच स्तरातून आता मदतीचा हात पुढे करण्यात येत असून त्यातच दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय भाजप आमदार राम कदम यांनीदेखील घेतला आहे. दरम्यान इतर दहीहंडी आयोजकांनाही त्यांनी सोहळा रद्द करण्याचे आवाहन केले आहेत. तसेच हा सोहळा साधेपणाने साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राम कदमांनी रद्द केली दहीहंडी
कोल्हापुर सांगली परिसरातील पुरग्रस्ताना सहायता करण्यासाठी ह्या वर्षी दही हंडी सोहळा रद्द करण्यात येत असून .. सर्व रक्कम पुरग्रस्ताना देण्यात येणार आहे . इतरही सर्व आयोजकनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपनाने करत सर्व रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधि मधे द्यावी
— Ram kadam (@ramkadam) August 15, 2019
1/2 सर्व रक्कम पुरग्रस्ताना देण्यात येणार आहे . इतरही सर्व आयोजकनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपनाने करत सर्व रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधि मधे द्यावी . नम्र निवेदन !
आमदार राम कदम— Ram kadam (@ramkadam) August 15, 2019
राम कदम यांनी गेल्या वर्षी आयोजित केलेला दहीहंडीचा सोहळा वेगळ्याच कारणासाठी गाजला होता. त्यांनी उपस्थित गोविंदांसमोर बोलताना एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राम कदम यांच्यावर चोहोबाजूंनी जबरदस्त टीका झाली होती. राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. तसेच राज्य महिला आयोगाने कदम यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना नोटीस बजावून आठ दिवसात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.