आज हॉंगकॉंगमध्ये साजरा होत आहे ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’


हॉंगकॉंगच्या पारंपारिक पंचांगानुसार सातव्या महिन्यातील पंधराव्या दिवशी ‘यु लान’ हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवालाच ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ असेही म्हटले जाते. यंदाच्या वर्षी हा उत्सव पंधरा ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने अनेक स्थानिक नागरिक आणि पर्यटक या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. चीनी परंपरेमध्ये पूर्वजांच्या स्मरणाला, त्यानिमित्त केल्या जाणाऱ्या पूजा-अर्चेला मोठे महत्व दिले गेले आहे. ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ हा देखील या परंपरेचा भाग असून, हा उत्सव दर वर्षी मोठ्या आनंदाने साजरा केला जात असतो. या उत्सव पाहण्यासाठी व त्यामध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक आवर्जून येथे येत असतात.

या उत्सवाची विशेषता अशी, की यामध्ये होळी सदृश अग्नी पेटविला जाऊन यामध्ये लोक पैश्यांच्या खोट्या नोटा आणि अन्नपदार्थ अग्नीच्या स्वाधीन करतात. तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मृती प्रीत्यर्थही अन्नपदार्थ ठेवण्यात येत असतात. या सोहळ्याची आणखी एक विशेषता अशी, की हा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, जवळजवळ संपूर्ण महिनाभर अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यामध्ये चीनी ऑपरा सहित इतरही अनेक पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यंदाच्या वर्षी हे विविध कार्यक्रम एक ऑगस्ट पासून आयोजित करण्यात येत
असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या काळादरम्यान स्थानिक लोक, आपल्या पूर्वजांसाठी वस्तू अर्पण करणे आणि उदबत्त्या व पेपर जॉस स्टिक्स लावल्या जात असतानाचे दृश्य संपूर्ण हॉंगकॉंगमध्ये सर्वत्र पहावयास मिळत असते. ‘यु लान’ किंवा ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ मुख्यत्वे ‘चिऊ चाऊ’ जमातीचे लोक साजरा करतात. या जमातीचे लोक मूळचे चीनमधील ग्वांगडॉंग प्रांतातील असून, आजच्या काळामध्ये या जमातीचे एकूण १.२ मिलियन लोक हॉंगकॉंगमध्ये वास्तव्यास आहेत.

Leave a Comment