पाक अभिनेत्री म्हणते, बॉलीवूडने आम्हाला बनविले दहशतवादी


ओस्लो – हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांनी तिच्या देशाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मेहविश हयात यांनी केला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे प्राइड ऑफ परफॉरमेंस अवॉर्ड मिळाल्यानंतर मेहविश यांनी आपल्या भाषणात हे आरोप केले. हयात हिला हा पुरस्कार नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी प्रदान केला.

मेहविशच्या भाषणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. ती म्हणाली, समाजात चांगले संदेश पोहचवण्याचे सर्वात शक्तिशाली चित्रपट हे माध्यम आहे यात काही देखील शंका नाही. आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आम्ही लोकांच्या वागण्यात व विचारात बदल घडवून आणू शकतो. पण, मला हे देखील म्हणायचे आहे की बॉलिवूड आणि हॉलिवूड यांनी एकत्रितपणे जगात पाकिस्तानची प्रतिमा मलिन केली आहे. पाकिस्तान हा एक असा देश आहे जो अत्यंत मागासलेला आणि तिथे फक्त दहशतवादीच आहेत. होमलँड, झिरो डार्क थर्टी आणि द ब्रिंक सारख्या चित्रपटांना मी माझ्या देशाला बदनाम करणारे चित्रपट म्हणून म्हणू शकते.

मेहविश पुढे म्हणाली, जर बॉलिवूडने विचार केला तर ते चित्रपटांचा वापर दोन्ही देशांमधील परस्पर समन्वय वाढविण्यासाठी करू शकेल. पण, त्यांनी आपल्या शक्तीचा वापर आमच्या देशाला बदनाम करण्यासाठी केला. आता त्यांना काय महत्वाचे आहे याचा विचार करावा लागेल? फक्त राष्ट्रवाद वा शांततापूर्ण भविष्य. हयात भारताचा उल्लेख करत म्हणाली की, भारतातील बॉलीवूड जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. लोकांना जोडण्याचे त्यांचे कार्य असायला हवे होते, परंतु असे असंख्य चित्रपट आहेत ज्यात पाकिस्तानचे खलनायक म्हणून वर्णन केले जाते. मेहविश यांनी काश्मीरचा उल्लेखही केला. ती म्हणाले, आमचे पंतप्रधान इम्रान खान आधीच म्हणाले आहेत की जर भारत जर एक पाऊल पुढे टाकत असेल तर आम्ही दहा पावले पुढे यायला तयार आहोत.

Leave a Comment