राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री सध्या घेत आहेत संपूर्ण विश्रांती


‘बधाई हो’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराच्या विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी गेले दहा महिने कामातून संपूर्ण विश्रांती घेतली आहे. ‘प्रत्येक वेळी पुरस्कार मिळाला, की त्यामागचा आनंद, समाधान हे प्रत्येक वेळी निराळेच’ असल्याचे म्हणणाऱ्या सुरेखा सिक्री यांना २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. सुरेखा सिक्री यांना लाभलेला हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार असून, यापूर्वी त्यांना १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘तमस’ मालिकेसाठी आणि १९९५ साली ‘मम्मो’ या चित्रपटासाठी साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद कसा साजरा करणार असे विचारले असता, सर्व परिवारजन आणि मित्रमंडळींना भेटून आनंद साजरा करीत असल्याचे सिक्री यांनी म्हटले आहे.

७४ वर्षीय सुरेखा सिक्री यांनी सध्या कोणतेही नवे काम हाती घेतले नसून, प्रकृती ठीक नसल्याने त्या संपूर्ण विश्रांती घेत आहेत. दहा महिन्यांपूर्वी सुरेखा यांना ब्रेन स्ट्रोक झाला असून, तेव्हापासून त्यांनी काम बंद केले आहे. महाबळेश्वर येथे चित्रीकरणाच्या निमित्ताने गेले असता, तिथे बाथरूममध्ये पडल्यामुळे सुरेखा यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या सध्या संपूर्ण विश्रांती घेत आहेत. आपली प्रकृती लवकरच सुधारून आपण पुन्हा काम करण्यास सुरुवात करणार असल्याचे सुरेखा म्हणतात.

‘बधाई हो’ या चित्रपटामध्ये सुरेखा यांनी नीना गुप्ता यांच्या सासूची भूमिका साकरली असून, कौटुंबिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटामध्ये दर्शविलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जसे नातेसंबंध दर्शविले गेले आहेत, तसेच नातेसंबंध प्रत्यक्षातही घराघरात पहावयास मिळत असल्याने हा चित्रपट दर्शकांना अधिक भावल्याचे सुरेखा म्हणतात. चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेला दर्शकांनी मनापासून दाद दिल्यानेच त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचेही सुरेखा सांगतात.

Leave a Comment