मासेमारीच्या जाणाऱ्या जुन्या जाळ्यांपासून बनविले जात आहेत ‘सर्फिंग बोर्ड्स’


जगाच्या पाठीवर सर्वत्र मनुष्याने वैज्ञानिक प्रगती केली असली, आणि त्यामुळे माणसाचे जीवन अतिशय सुकर झाले असले, तरी या प्रगतीचे दुष्परिणाम प्रदूषणाच्या रूपाने केवळ माणसालाच नाही, तर निसर्गातील इतर जीवजंतूंनाही भोगावे लागत आहेत. हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या कामी जगातील सर्वच देश प्रयत्नशील आहेत. यासाठी ज्या वस्तूंचे नैसर्गिक रित्या विघटन होत नाही, अश्या वस्तूंचे रीसायकलिंग करून त्या वस्तू पुन्हा वापरात आणण्याचे यशस्वी प्रयोग अनेक ठिकाणी केले जात आहेत. भारतातच एकीकडे बेंगळूरूमध्ये प्लास्टिकचा वापर करून पेव्हमेंट टाईल्स बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला जात असतानाच तमिळनाडूमध्येही मच्छीमार, मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या, पण आता जुनी झाल्यामुळे न वापरता येण्याजोग्या जाळ्यांना रिसायकल करून त्यांपासून सर्फिंग बोर्ड्स तयार करीत आहेत.

‘स्ट्रेट टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘डीएसएम सोल्युशन्स” या ‘न्युट्रीशन आणि सस्टेनेबल लिव्हिंग’साठी काम करणाऱ्या सहकारी संस्थेच्या आणि ‘स्टारबोर्ड्स’ या थायलंड मधील वॉटर स्पोर्ट्स कंपनीच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. मच्छीमार मासेमारीसाठी जात असताना निकामी किंवा जुनी झालेली, वापरता न येण्याजोगी जाळी समुद्रातच टाकून देतात. या प्रकल्पाअंतर्गत ही जाळी पाण्याबाहेर काढून आधी स्वच्छ केली जातात, त्यांचे ‘ग्रॅन्यूलेशन’ केले जाते, म्हणजेच ही जाळी सुटी केली जातात, आणि त्यानंतर ही जाळी पुणे येथील प्रकल्पाच्या कारखान्यात पाठविली जातात. या कारखान्यामध्ये ‘डीकन्स्ट्रक्टेड’ जाळ्यांची कसून तपासणी केली जाते. आणि त्यानंतरच यांचा वापर इको फ्रेंडली सर्फिंग बोर्ड्स बनविण्यासाठी करण्यात येतो.

पाण्यामध्ये फेकून दिलेल्या जुन्या, निकामी जाळ्यांमुळे समुद्री जीवांना मोठा धोका निर्माण झाला असून, अनेकदा मासे किंवा इतर समुद्री जीव या जाळ्यांचे लहान लहान तुकडे खात असतात. तसेच पाण्यामध्ये पडलेल्या या जाळ्यांमध्ये समुद्रातून आवागमन करणाऱ्या बोटींचे प्रोपेलर्स अडकूनही मोठा धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. ‘डीएसएम’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये, सुमारे ६४०,००० टन वजनाची निकामी जाळी महासागरांमध्ये असल्याचे म्हटले गेले आहे. महासागरांमध्ये सापडणाऱ्या एकूण प्लास्टिकच्या कचऱ्यापैकी हे प्रमाण केवळ दहा टक्के असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. यावरूनच जगभरामध्ये महासागरांमध्ये प्लास्टिकचा कचरा किती मोठ्या प्रमाणावर अस्तिवात आहे, याची कल्पना आपण करू शकतो.

या प्रकल्पाद्वारे समुद्रातून जुनी, निकामी जाळी काढली जात असल्याने समुद्री जीवजंतू आणि मनुष्यांना ही असलेला धोका काही प्रमाणात कमी होत आहेच, पण त्याचबरोबर या प्रकल्पाद्वारे समुद्राच्या आसपास असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी उपजीविकेचे साधनही उपलब्ध झाले आहे. जाळ्यांचे संकलन, त्यांच्या निरनिराळ्या प्रकारांच्या अनुसार त्यांचे वर्गीकरण, जाळी स्वच्छ करणे, आणि त्यांचे प्रोसेसिंग करणे अशी निरनिराळी कामे या प्रकल्पाअंतर्गत केली जात असतात.

Leave a Comment