२०३० सालापर्यंत ही ठरणार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे


जगामध्ये माणसांची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत चालली आहे. २०५० सालापर्यंत या धरातलावर तब्बल दहा बिलियन माणसे असणार आहेत. आजच्या काळामध्ये टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे शहर असून, या शहराची लोकसंख्या ३८ मिलियन आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये न्यूयॉर्क शहराचाही समावेश असून, येथील लोकसंख्या ८.५ मिलियन इतकी आहे. सध्या ही शहरे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारी शहरे असली, तरी आणखी तीस वर्षांमध्ये या दृश्यामध्ये मोठा बदल घडून येणार असल्याचे मत ‘टेक इनसायडर’ या वतीने मांडण्यात आले आहे.

पुढील काही काळामध्ये युरोप आणि अमेरिकेतील वाढत्या लोकसंख्येला आळा बसण्याची चिन्हे असली, तरी मध्यपूर्वी देशांमध्ये, आशिया खंडातील देशांमध्ये आणि आफ्रिकेमधील लोकसंख्या मात्र वाढत राहणार असून, २०३० सालापर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये अनेक नव्या शहरांचा समावेश होणार असल्याचे ‘टेक इनसायडर’चे मत आहे.

‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स’च्या सर्वेक्षणानुसार २०३० साली देखील टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे शहर ठरणार असून, येथील लोकसंख्या ३७.२ मिलियनच्या घरात असणार आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताची राजधानी दिल्ली असून आणखी तीस वर्षांमध्ये दिल्लीची लोकसंख्या ३६.१ मिलियन असणार आहे.

यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चीनमधील शांघाय हे शहर असणार असून येथील लोकसंख्या ३०.८ मिलियन असणार आहे, तर त्यापाठोपाठ मुंबईची लोकसंख्या २७.८ मिलियन असणार आहे. चीनमधील बीजिंग शहर या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर असून येथील लोकसंख्या २७.७ मिलियन असणार आहे, तर त्या पाठोपाठ बांगलादेशची राजधानी ढाका येथील लोकसंख्या पुढील तीस वर्षांमध्ये २७.४ मिलियन इतकी असणार आहे.

पाकिस्तानातील कराची येथील लोकसंख्या २४.८ मिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, इजिप्त देशातील कैरो येथील लोकसंख्या २४.५ मिलियन पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नायजीरिया देशाचा देखील या यादीमध्ये समावेश असून येथील लागोस शहराची लोकसंख्या २४.२ मिलियन, तर मेक्सिकोमधील मेक्सिको सिटीची लोकसंख्या २३.९ मिलियन पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Comment