हे रेस्टॉरंट गुगलवर मिळविते आपल्या ग्राहकांची माहिती !


आजकालच्या काळामध्ये सणावारी, किंवा एखाद्या निमित्ताने घरामध्ये भोजन तयार करून जेवण्याऐवजी बाहेर जाऊन भोजन करण्याला जास्त प्राधान्य मिळताना दिसत आहे. प्रसंग कोणताही असो, मेजवानी द्यायची असली, की एखाद्या चांगल्याश्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र भेटून एकत्र भोजनाचा आस्वाद घेण्याचे उत्तम निमित्तच आपल्याला मिळत असते. त्यामुळे आजकाल केवळ सुट्टीच्या दिवशी किंवा सणावारीच नाही, तर एरव्ही देखील रेस्टॉरंट्समध्ये गर्दी वाढताना दिसू लागली आहे. त्यातून रेस्टॉरंट जर अतिशय लोकप्रिय असेल, तर अश्या ठिकाणी जाताना आधीपासूनच बुकिंग्ज करून ठेवावी लागत असतात. मात्र तुमचे बुकिंग स्वीकारण्यापूर्वी त्या रेस्टॉरंटने तुमच्या विषयी गुगलवर सर्व माहिती शोधून काढून त्या आधारे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये बुकिंग द्यायचे अथवा नाही हे ठरवले असल्याचे तुम्हाला समजले तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल?

न्यूयॉर्क शहराच्या उच्चभ्रू भागामध्ये असलेल्या एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये भोजन घेण्यासाठी बुकिंग्ज करणाऱ्या ग्राहकांना असेच काहीसे अनुभव सध्या येत आहेत. अनेक ग्राहकांची बुकिंग्ज रेस्टॉरंट व्यवस्थापनाने रद्द केली असल्याने ग्राहकांमधे काहीसा नाराजीचा सूर असला, तरी रेस्टॉरंट मात्र आपल्या कडे कोण ग्राहक यावेत आणि कोण येऊ नयेत याची निवड करण्याबाबत अतिशय आग्रही आहे. ‘ल बिल्बोक्वे’ या रेस्टॉरंटची गणना, न्यूयॉर्क शहरातील आलिशान रेस्टॉरंट्स मध्ये केली जाते. मोठमोठे उद्योजक, राजकीय नेते, आणि इतर सेलिब्रिटीज या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेण्यासाठी येत असतात. मात्र या रेस्टॉरंटमध्ये केवळ वीस ग्राहकांना बसण्यासाठी जागा असून, या जागा कोणाला दिल्या जाव्यात आणि कोणाला दिल्या जाऊ नयेत याचा निर्णय सर्वस्वी व्यवस्थापनाकडे असतो. या रेस्टॉरंटमध्ये कायमच बड्याबड्या, धनाढ्य मंडळींची रेलचेल असल्याने येथे येणारा प्रत्येक ग्राहक नामवंत आणि अर्थातच भरपूर श्रीमंत असला पाहिजे असा रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाचा विचित्र आग्रह आहे.

एखाद्या व्यक्तीने या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेण्यासाठी जागा आरक्षित केली, तर रेस्टॉरंटच्या वेबसाईटवर व्यक्तीला आपले नाव, फोन नंबर, इमेल आयडी, इत्यादी सर्व माहिती रेस्टॉरंटकडे द्यावी लागते. त्यानंतर रेस्टॉरंट व्यवस्थापनातील कर्मचारी ग्राहकाची संपूर्ण प्रोफाईल गुगल द्वारे तपासून पहात असून, रेस्टॉरंटच्या ‘सेलिब्रिटी स्टाईल’ला ग्राहकाचे ‘स्टेटस’ साजेसे असेल तरच रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठीचे ग्राहकाचे बुकिंग स्वीकारले जाते. अन्यथा रेस्टॉरंटच्या वतीने हे बुकिंग रद्द करण्यात येऊन ग्राहकाला तसे सूचित करण्यात येते. ग्राहकाचे रेस्टॉरंट बुकिंग स्वीकारण्यापूर्वी ग्राहकाची सर्व माहिती गुगल द्वारे तपासून पाहण्यात येत असल्याच्या पद्धतीला रेस्टॉरंटचे प्रवक्ता जॉश व्लास्टो यांनी दुजोरा दिला असून, हे रेस्टॉरंट केवळ काही खास लोकांसाठीच असल्याने ही पद्धत अवलंबली जात असल्याचे म्हटले आहे. या रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी येणाऱ्या मंडळींमध्ये सुप्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डीनीरो, पॉल मॅककार्टनी आणि ट्रंप-कन्या इव्हान्का यांचा समावेश आहे. रोनाल्ड पेरेलमन या अमेरिकन अब्जाधीशाच्या मालकीचे हे रेस्टॉरंट असून, हे रेस्टॉरंट मागील वर्षी सुरु झाले आहे. रोनाल्ड यांच्या मालकीची इतरही अनेक आलिशान रेस्टॉरंट्स अमेरिकेतील इतर अनेक शहरांमध्ये आहेत.

Leave a Comment