युद्धाच्या पावित्र्यात पाकिस्तान, आठवडाभरात उतरले अवसान!


केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यावर काय उपाय करावा हे त्याला समजेनासे झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही याबाबत पाकिस्तानला भीक घालण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून पाकिस्तानने युद्धाचा पावित्रा घेतला मात्र वास्तवाची जाणीव झाल्यावर एका आठवड्यात त्याचे अवसान उतरले आहे.

भारताने 370 कलम रद्द केल्यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी त्वरित आयएसआय आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात प्रत्येकाने अगदी दात-ओठ खावून भारताला धडा शिकविण्याची भाषा केली होती. त्यानंतर इम्राननी भारताशी सर्व प्रकारचे राजनयिक संबंध संपवण्याचे जाहीर केले. भारताचे इस्लामाबादमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवण्याची व आपलाही दिल्लीतील उच्चायुक्त परत बोलवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर व्यापार बंद करण्याची भाषा केली. मात्र या सर्वांचा काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा हा मुद्दा राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत उचलण्याचे ठरवले. त्यालाही काही यश आले नाही.

कलम 370 हा भारताचा अंतर्गत विषय आहे, हे जगातील जवळजवळ सर्व देशांनी मान्य केले आहे. त्यामुळे पाकिस्तानने यावर कितीही आदळआपट केली तरी त्याची कोणी दखल घेतली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलाही देश ठामपणे पाकिस्तानच्या मागे उभा नाही. अगदी ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी) या संघटनेनेही पाकिस्तानची निराशाच केली. काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केवळ पाकिस्तानच्या विनंतीवरुन 6 ऑगस्ट रोजी ‘ओआयसी’ने एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘ओआयसी’ने काश्मीरमधल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली व दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. पण पाकिस्तानच्या सांगण्यावरुन भारताविरुद्ध भूमिका घेतली नाही.

जागतिक समुदायाने अशा प्रकारे अपमान करणे इम्रान यांना एवढे लागले, की त्यांनी थेट भारताची तुलना नाझी जर्मनीशी केली. भारताच्या काश्मिर धोरणाकडे जगाने दुर्लक्ष करणे हे हिटलरकडे दुर्लक्ष करण्यासारखेच आहे, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले. काही पाश्चिमात्य माध्यमे वगळता त्यालाही फारसे महत्त्व कोणी दिले नाही. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही भारताशी युद्ध करणे हा चौथा पर्याय असल्याचे म्हटले होते.

मग अखेरचा उपाय म्हणून पाकिस्तानने थेट भारताशी युद्ध करण्याची तयारी सुरु केली. पाकिस्तानने लडाखला लागून असलेल्या सीमेवर युद्ध सामग्रीची जमवाजमव सुरू केली आणि तिथे ‘जेएफ-17’ लढाऊ विमानांचा ताफा तैनात करण्याचा प्रयत्न केला. लडाखच्या सीमेलगत पाकिस्तानच्या हद्दीतील स्कार्डू भागात युद्ध सामग्रीची जमवाजमव करण्यात आली. पाकिस्तान हवाई दलाच्या तीन ‘सी-130’ मालवाहू विमानांद्वारे शनिवारी या ठिकाणी युद्धसामग्री आणण्यात आली होती.

दुसरीकडे भारतीय गुप्तहेर यंत्रणा, हवाई दल आणि लष्कर पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. पाकिस्तानच्या हवाई दल आणि लष्कराने सीमेलगत संयुक्त युद्ध सरावाची योजना आखली होती. ही हालचाल त्याच सरावाचा भाग असल्याचा अंदाज भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

काश्मिरला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही कोणत्याही पातळीवर जाऊ, असे इम्रान यांनी राणा भीमदेवी थाटात सांगितले. मात्र पाकिस्तानने युद्धाच्या कितीही गमजा मारल्या तरी ते पाकिस्तानसाठी सोपे राहिलेले नाही. पाकिस्तानला एका आठवड्याच्या आत वास्तवाचे भान आले आहे. म्हणूनच पाकिस्तानने राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. याचे कारण म्हणजे सुरक्षा परिषदेतील चीन वगळता अन्य कोणताही देश पाकिस्तानच्या बाजूने नाही. चीननेही उघडपणे आपला पाठिंबा दिलेला नाही, हे महत्त्वाचे. इम्रान खान यांनी कलम 370 रद्द झाल्यानंतर जी समिती बनवली त्या समितीचेही कुरेशी हे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे.

जो पाकिस्तान 7 ऑगस्टपर्यंत युद्धाची भाषा करत होता तो आता जमिनीवर आला आहे. याचे कारण म्हणजे भारताशी युद्ध करण्याची त्याची आर्थिक कुवत राहिलेली नाही आणि अन्य देशांकडून त्याला मदत मिळण्याची आशा नाही. म्हणूनच एका आठवड्याच्या आत आपले शब्द गिळण्याची वेळ त्या देशावर आली आहे.

Leave a Comment