काश्मिरी पंडितांना खुणावत आहे मातृभूमी!


जम्मू-काश्मिरला भारतापासून वेगळे करणारे कलम 370 केंद्र सरकारने निष्प्रभ केल्यामुळे एका नव्या युगाची सुरूवात झाली आहे. आता जम्मू-काश्मिरमध्ये जमिनी विकत घेता येतील आणि तेथील मुलींशी लग्न करता येईल, असे मनसुबे अनेकांनी रचले आहेत. काही राजकारण्यांसहित अनेक लोकांनीही त्यावर वावदूक वक्तव्येही केली. मात्र या कलमाच्या रद्द होण्यामुळे काश्मिरी पंडितांच्या मनात उभारी आली असून आपल्या प्रिय मातृभूमीत परतण्याची आशा त्यांच्यात निर्माण झाली आहे.

तीन दशकांपूर्वी मुस्लिम बहुसंख्यक असलेल्या काश्मिर खोऱ्यातून जीव वाचवून पळालेले उत्पल कौल यांचे घर तलावाच्या काठीच होते. आपल्या घरी आणि बागांमध्ये परत जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते इतिहासतज्ञ आहेत मात्र गेल्या आठवड्यातपर्यंत त्यांचे हे स्वप्न अशक्यप्राय वाटत होते. मात्र आता त्यांच्या डोळ्यांत चमक आली आहे. कौल हे सध्या 67 वर्षांचे असून ते नवी दिल्लीत निर्वासितांचे जीवन जगत आहेत. आता आपले स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांना वाटते. एएफपी वृत्तसंस्थेशी याबाबत बोलताना ते ओक्साबोशी रडत असल्याचे एएफपीच्या वार्ताहराने म्हटले आहे.

“माझ्या हयातीत मी हा दिवस कधी पाहू शकेन, असे कधीही वाटले नव्हते. मी भलेही तेथे नसेल मात्र माझे हृदय काश्मिरमध्येच आहे,” असे त्यांनी सांगितले. काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार उसळला तेव्हा 1989 मध्ये रातोरात लाखो पंडितांना आपले घरदार सोडून यावे लागले. काश्मिरी पंडित म्हणून ओळखले जात असलेले हे लोक हिंदूंची बहुसंख्या असलेल्या जम्मूमध्ये व भारताच्या अन्य भागांमध्ये जाऊन स्थायिक झाले. कौल हे त्याच दोन लाख पंडितांपैकी आहेत. कौल यांचे घर पाच मजल्यांचे होते आणि त्या घराची लूट करून त्यात 1990 मध्ये आग लावण्यात आली. कौल आणि त्यांच्या कुटुंबियांना जे काही हाताला लागेल ते सावरून गाव सोडणे भाग पडले. त्यांनी आजही जुनी पुस्तके सांभाळून ठेवली आहे. भारताचा निर्णय हा आपल्या प्रिय मातृभूमीसाठी एक नवी सकाळ असून आता काश्मिरमध्ये सर्व जण समान असतील, असे ते म्हणतात.

कौल यांच्या प्रमाणेच वितेक रैना यांनाही काश्मिर सोडून पलायन करावे लागले होते. ते दिल्लीत राहतात आणि आजही ती हिंसा आठवली, की त्यांच्या अंगावर शहारे उठतात. फुटीरवाद्यांनी काश्मिर बंदचे आवाहन केले होते तेव्हा त्यांना विरोध केल्याबद्दल रैना यांच्या काकांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. लहान असताना एका न्हाव्याला त्यांनी पाकिस्तानऐवजी भारतीय क्रिकेटपटूसारखे केस कापायला सांगितले होते तेव्हा त्याने त्यांना थोबाडीत मारली होती. असे अनेक कटू अनुभव असूनही आजही काश्मिर त्यांना खुणावतोय.

काश्मिरमध्ये कुंपणांनी वेढलेल्या काही वस्त्या विकसित करण्यात येतील जेणेकरून काश्मिर सोडलेले हिंदू परत येऊन तेथे राहू शकतील, असे भारत सरकारने 2015 साली जाहीर केले होते. या कुंपणांच्या आतच घर, शाळा, रुग्णालय आणि शॉपिंग मॉल असणार होते. मात्र त्याबाबत काश्मिरी हिंदूंमध्ये मतभेद आहेत. “आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे असेल तर आम्हाला पूर्वीप्रमाणे मुस्लिम शेजाऱ्यांसोबतच राहावे लागेल. काश्मिरमधील हिंसाचाराला अनेक दशके उलटली आहेत आणि हा हिंसाचार इतक्यात संपेल असे वाटत नाही. मात्र आम्ही निश्चितच तेथे जाऊ आणि काश्मिरला आपला भाग बनवू,” असे रैना म्हणतात.

काश्मिरी पंडितांना पुन्हा खोर्‍यात नेण्यासाठी केंद्र शासनाने श्रीनगर किंवा त्याच्या जवळपास एखादे स्वतंत्र शहर वसवावे. देशभरातून येणार्‍या पंडितांना तेथे राजकीय आणि प्रशासकीय अधिकार द्यावेत. मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी पनून काश्मीर संघटनेचे अध्यक्ष डॉ. अग्नीशेखर यांनी केली आहे. ‘‘कलम ३७० रहित केल्यामुळे पंडितांनी आजवर सोसलेल्या अत्याचारावर मलम लागले आहे. वर्ष १९९० मध्ये खोर्‍याबाहेर काढल्यापासून काश्मिरी पंडित निर्वासित होऊन रहात आहेत. पंडितांना बाहेर काढतांना त्यांची खोर्‍यातील घरे जाळून टाकण्यात आली आहेत. जमिनींचा हक्क बाहेरून आलेल्यांनी घेतला आहे. अशा वेळी ज्यांनी हे केले, त्यांच्यासमवेत काश्मिरी पंडित कसे काय राहू शकतील,” असा प्रश्न डॉ. अग्नीशेखर यांनी केला आहे.

काश्मिर खोरे आजही सुरक्षित झालेले नाही. काश्मिरचे मुख्य शहर श्रीनगर अजूनही काटेरी तारा, तपासणी नाके आणि सशस्त्र सैनिकांनी घेरलेले आहे. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण व्हायला अजूनही काही काळ जावा लागेल. मात्र काश्मिरी पंडितांच्या या भावनांमुळे जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी या संस्कृत वचनाची प्रचिती येते.

Leave a Comment