पर्यटकांना ‘चंद्रप्रवासाचा’ अनुभव करवून देत आहे कॅथीड्रल चर्च


२० जुलाई १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाऊल ठेवणारे प्रथम मानव ठरले, आणि मानवाने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या विश्वात एका नवा इतिहास रचला गेला. याच ऐतिहासिक घटनेला यंदाच्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंग्लंडमधील स्टॅफोर्डशायर येथील लिचफील्ड भागामध्ये असलेले भव्य कॅथीड्रल(चर्च) येथे येणाऱ्या पर्यटकांना एक आगळा वेगळा अनुभव करून देत आहे. या कॅथीड्रल मधील सर्व जमीन, चंद्रावरील भूपृष्ठाप्रमाणे खडबडीत बनविण्यात आली आहे, जेणेकरून चंद्राच्या भूपृष्ठावर ज्याप्रमाणे खड्डे आहेत, त्यांचा आभास पर्यटकांना व्हावा.

कॅथीड्रलच्या उंच छतावर अनेक रंगेबिरंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, आठशे वर्षांपूर्वी निर्माण केल्या गेलेल्या या कॅथीड्रलमध्ये येणारे पर्यटक जमिनीवर पहुडून छतावरील आकर्षक रोषणाई पाहण्याचा अनुभव घेत असतात. कॅथीड्रलच्या एका भागामध्ये अपोलो ११ मिशनचे प्रतीक म्हणून एक साडेचार फुट उंचीचे रॉकेट उभारण्यात आले आहे.

मानवाला सर्वप्रथम चंद्रावर यशस्वीरीत्या घेऊन जाणारी अपोलो ११ ही मिशन असल्याने हे रॉकेट या मिशनचे प्रतीक म्हणून येथे उभे करण्यात आले आहे. तसेच ही ऐतिहासिक घटना दर्शविणारी एक चित्रफितही पर्यटकांसाठी कॅथीड्रलमध्ये दाखविण्यात येत असून, त्यासोबत आकर्षक ‘लाईट अँड साऊंड’ शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या शोला ‘लक्समुरॅलिस’ असे नाव देण्यात आले असून, चर्चमधेच वास्तव्यास असलेले आर्टिस्ट पीटर वॉकर यांची ही संकल्पना असून, संगीतकार डेव्हिड हार्पर यांच्या मदतीने हा लाईट अँड साऊंड शो साकारण्यात आला आहे.

Leave a Comment