पुन्हा सोनियाच अध्यक्ष – काँग्रेसचे ये रे माझ्या मागल्या…


लोकसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर हतोत्साहीत झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राहुल गांधींनी दिला. एक प्रकारे पक्षाला अर्ध्या वाटेत सोडून त्यांनी आपला स्वतःचा मार्ग धरला. तेव्हापासून काँग्रेसचा नवा प्रमुख शोधण्यासाठी मंथन सुरू होते. सुमारे अडीच महिन्यांच्या मंथनानंतर काँग्रेसने अखेर पुन्हा सोनियांपुढे शरणागती पत्करून त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. खरे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत ही माळ नव्हे तर धोंड बनली आहे. मात्र त्यातून काँग्रेसचीच मजबूरी समोर आली आहे.

काँग्रेसमध्ये कार्यसमिती म्हणजे सीडब्ल्यूसी ही निर्णय करणारी सर्वोच्च संस्था म्हटली जाते. शनिवारी काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली तेव्हा सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाला. या बैठकीपूर्वी अनेक प्रकारची नावे या पदासाठी सुचविण्यात आली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अध्यक्ष बनतील असे अनेक जण छातीठोक पणे सांगत होते, तर अनेक जण ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावावर ठाम होते. काही जणांनी तर प्रियंका गांधींचे नावही चालवून पाहिले. मात्र काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला सरावलेल्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांनी या सर्व नावांवर फुली मारली आणि अखेर थकल्या-भागलेल्या सोनियांनाच या पदावर बसवले.

वास्तविक काँग्रेसच्या या नेत्यांची इच्छा राहुल गांधींनाच प्रमुख पदावर बसवण्याची होती. त्यासाठी गेले अडीच महिने ही मंडळी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होती. शनिवारीही काँग्रेसजनांनी राहुल यांची समजूत काढण्याचा काही कमी प्रयत्न केला नाही. मात्र राहुल यांनी आपला निर्णय सोडला नाही. राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अध्यक्षपदी राहण्यासाठी तयार करावे, अशी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक तास चर्चा केली. मात्र राहुल यांनी त्यांना गुंगारा दिल्यामुळे अखेर निरुपाय होऊन काँग्रेस नेत्यांना बैठक करावी लागली. राहुल यांनी तर पक्षाच्या प्रमुख पदी नेहरु-गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती नको, असा ठाम आग्रह धरला होता. तरीही गांधी घराण्याबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीची अध्यक्षपदी कल्पना काँग्रेसजनांना पचणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी नाना तऱ्हेने समजूत घालून सोनियांना या पदासाठी तयार केले.

तसे पाहायला गेले, तर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष असतील अशी पळवाट काँग्रेसीजनांनी काढून ठेवली आहे, मात्र त्यामुळे कोणताही फरक पडण्यासारखा नाही. काँग्रेस ही नेहरु-गांधी परिवाराचा पेढी बनली आहे, त्यामुळे सोनिया गांधींना अध्यक्षपदावरून उतरायला कोणी सांगेल ही शक्यताच नाही.

आता सोनियाजी नावाला हंगामी प्रमुख असल्या तरी त्या तहहयात त्या पदावर राहू शकतील, यात शंका नाही. कारण कार्यसमितीत जवळपास सर्व नेहरु-गांधी कुटुंबाची खुशमस्करी मंडळी भरलेली आहे. सोनिया असो वा राहुल, त्यांच्यासमोर हूं का चूं करण्याचीही हिंमत त्यांच्यात नाही.
काँग्रेसला आपल्या पक्षासाठी हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र काँग्रेसचा हा निर्णय काँग्रेसजनांच्या मानसिक गरीबी आणि गुलामगिरीचा भक्कम पुरावा म्हणून दाखवला जाऊ शकतो. काँग्रेस कार्यकर्ते व नेते अशा पद्धतीचे मानसिक पातळीवर एका कुटुंबाचे गुलाम बनले आहेत. गांधी या नावाच्या पलीकडे ते कुठलाही विचार करू शकत नाहीत.

सोनिया गांधी यांनी सुमारे वीस वर्षे काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यांच्याच काळात काँग्रेसला दोनदा सत्तेत जाण्याचा मान मिळाला. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी प्रमुखपदी बसले. मात्र राहुल यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारे यश नोंदवता आलेले नाही. अखेर लोकसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. राहुल यांनी घेतलेला निर्णय बरोबर होता. मात्र तरीही त्यांच्या मागे लाळघोटेपणा करत काँग्रेसजन फिरत होते. राहुल यांच्या म्हणण्यानुसार, गांधी कुटुंबाबाहेरच्या एखाद्या तरुण-तडफदार नेत्याची निवड करणे ही काँग्रेसजनांची जबाबदारी होती. मात्र सध्याच्या काँग्रेसजनांना कुटुंबाची गुलामी करण्याची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढे जाण्याच्या ऐवजी ते मागे आले. ज्या सोनियांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निरोप घेतला त्यांनाच पुन्हा बळजबरी त्या पदावर बसवण्यात आले.

असे नाही की काँग्रेसकडे नेते नाहीत. राष्ट्रीय पातळीवर भलेही काँग्रेस दुर्बल झाली असेल, मात्र राज्य पातळीवर काँग्रेसकडे आजही मजबूत म्हणता येण्यासारखे नेते आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगड अशा महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर आहे. केरळसारख्या राज्यात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली आहे. तेथील नेत्यांना नेतृत्वाची संधी द्यायला काय हरकत होती? मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या नावाचा विचारही केला नाही.

या नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख किंवा प्रभाव नाही म्हणावा तर राहुल यांचा तरी किती प्रभाव आहे? त्यांच्या नेतृत्वातच काँग्रेस केवळ 50 जागांपुरती संकुचित झाली ना? काँग्रेसने 2014ची निवडणूक सोनिया गांधींच्या नेतृत्वात लढली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसची ही आतापर्यंतची निच्चांकी कामगिरी होती. मह सोनियांचा तरी काय प्रभाव म्हणायचा? तरीही आज त्यांनाच पुन्हा अध्यक्ष केले ना?
म्हणूनच पुन्हा सोनियांना अध्यक्ष करणे म्हणजे मानसिक गुलाम झालेल्या काँग्रेसचे ये रे माझ्या मागल्या… म्हणणे आहे. दुसरे काही नाही.