दहशतवादाचे पाप धुण्यासाठी पाकिस्तान मंदिरांच्या दारात!


अलीकडेच पाकिस्तानमधून भारतासाठी एक अशी बातमी आली जिची आपण कधीही अपेक्षा करू शकत नाही. भगवान शंकरांचा महीमा सांगणारा श्रावण महिना सुरू झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत आलेल्या या बातमीमुळे समस्त शिवभक्तांना आनंद होईल, यात शंका नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र छी-थू झालेल्या पाकिस्तानने आपली प्रतिमा उजळवण्यासाठी मंदिरांचा आधार घेतला असून त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांना पुन्हा उर्जितावस्था आली आहे.

होय, या बातमीनुसार सियालकोटच्या 1000 वर्षे जुन्या तेजा सिंह या शिवमंदिराचा र्जीणोद्धार होत आहे. गेल्या 72 वर्षांपासून बंद असलेले हे मंदिर आता भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

अर्थात पाकिस्तानातील हिंदू मंदिरांचा हा जीर्णोद्धार एकदम अनपेक्षित म्हणता येणार नाही. कारण देशात झालेल्या संसदीय निवडणुकांत सध्याच्या सत्ताधारी पक्षाने तशा प्रकारचे आश्वासन दिले होते. तहेरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि वर्तमान पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक प्रचारातच हे आश्वासन दिले होते, की आमचा पक्ष निवडून आला तर हिंदूंच्या नामशेष झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून ते हिंदूंकडे सोपवण्यात येतील जेणेकरून तिथे पुन्हा पूजा-अर्चना सुरू होईल.

पाकिस्तानातील पूर्वीच्या नेत्यांनीही निवडणूक प्रचारात अशा घोषणा केल्या होत्या. मात्र सत्तेवर आल्यानंतर मंदिरांना उर्जितावस्था आणण्याचे धाडस त्यांच्यापैकी कोणीही केले नव्हते. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या निवडणुकीतही ही घोषणा झाली तेव्हा ते एक आश्वासनच मानले गेले होते. आपल्याकडच्या भाषेत सांगायचे झाले, तर प्रचारातील ‘जुमला’ म्हणूनच त्याकडे पाहिले गेले. मात्र सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर ज्यावेळी इम्रान खान यांनी हे आश्वासन पूर्ण करण्याची घोषणा केली तेव्हा तेथील हिंदू समुदायच नव्हे तर सत्ताधारी व विरोधी पक्षांनाही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. पाकिस्तानात सुमारे 400 मंदिर भग्नावस्थेत उभी आहेत. त्यांचा जीर्णोद्धार करून तहेरीक-ए- इन्साफ पक्षाने हिंदूंना न्याय दिल्याचे सर्वसाधारण मानले जात आहे.

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा 428 मंदिरे पाकिस्तानात राहिली होती. या मंदिरांकडे 1947 पासून दुर्लक्षच होत गेले, मात्र त्यांची सर्वात वाईट अवस्था 1992 नंतर झाली. भारतातील वादग्रस्त कथित बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानातील कट्टरपंथियांनी तेथील बहुतांश मंदिरांची नासधूस केली किंवा ती ताब्यात घेतली.

पाकिस्तानातील ‘ऑल पाकिस्तान हिंदू राईट मूव्हमेंट’ नावाच्या संघटनेने 1990 च्या दशकात एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार 428 पैकी 408 मंदिरांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. बहुतेक मंदिरांमध्ये जनरल स्टोअर आणि उपाहारगृहे उघडण्यात आली होती. अनेक मंदिरांमध्ये तर सरकारी कार्यालये आणि मदरसे थाटण्यात आली होती. काही मंदिरांना तर दहशतवाद्यांचा अड्डा करण्यापर्यंत कट्टरपंथियांची मजल गेली होती. या मंदिरांची डागडुजी करून ती हिंदूंना सोपवावीत जेणेकरून पाकिस्तानातील अल्पसंख्यक हिंदू समाज स्वतःला असुरक्षित समजणार नाही, अशी मागणी ही संस्था अनेक वर्षांपासून सरकारकडे करत होती.

पूर्वीच्या सरकारांनी केवळ तोंडी आश्वासने देऊन या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. या सरकारांनी या मंदिरांना कट्टरपंथीय किंवा सरकारी संस्थांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्नही केला नव्हता.

मात्र इम्रान सरकारने यातील सुमारे अर्ध्या मंदिरांचा ताबा स्वतःकडे घेऊन त्यांची डागडुजी सुरू केली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सिंधमधील 11, पंजाबमधील 4, बलूचिस्तानमधील 3 आणि खैबर पख्तुनख्वामधील 2 मंदिरांचा र्जीणोद्धार करून ती हिंदूंना सोपवण्यात येतील. हे सरकार या मुद्द्यावर खरोखर गंभीर आहे याचा पुरावा म्हणजे याच वर्षातील फेब्रुवारी महिन्यात खैरपूर येथील एका मंदिराची कट्टरपंथियांनी नासधूस केली होती. तेव्हा इम्रान खान यांच्या सरकारने पूर्वीच्या सरकारप्रमाणे केवळ टीका-टिप्पणी न करतात कारवाईसुद्धा केली होती. नुकसान करणाऱ्यांचा केवळ तपासच नव्हे तर त्यांना ठराविक मुदतीत पकडण्याचा आदेशही देण्यात आला होता. स्वतः इम्रान यांनी या घटनेचा निषेध केला होता.

या सर्वावरून एक मथितार्थ काढता येऊ शकतो, की इम्रान सरकार भारताशी संबंध सुधरण्यासाठी हे उपाय करत आहे. आपला देश खूप शांतताप्रेमी आणि समंजस असल्याचे दाखवण्यासाठी पाकिस्तानची धडपड चालू आहे आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये त्याची प्रतिमा खूप खालावली आहे. अमेरिकाच नव्हे तर युरोपमधील बहुतांशदेश पाकिस्तानकडे दहशतवाद्यांचे पैदास केंद्र म्हणूनच पाहत आहेत. दहशतवाद्यांना मदत करणारा देश म्हणून ओळख निर्माण झाल्यामुळे बहुतांश देश त्याच्या विरुद्ध झाले आहेत. ही प्रतिमा स्वच्छ करायची तर त्यासाठी भारतासोबत संबंध सुधारणे गरजेचे आहे, हे पाकिस्तानला माहीत आहे. दहशतवादाचे आपले पाप धुण्यासाठी पाकिस्तानने हा मंदिरांचा मार्ग धरला आहे, असेही म्हणता येईल.

Disclaimer: या लेखात मांडली गेलेली मते आणि दृष्टीकोन लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी माझा पेपर व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. तसेच वरील लेखाची कोणत्याही प्रकारची जवाबदारी माझा पेपर घेत नाही