दोन उकडलेल्या अंड्यांचे तब्बल १७०० रुपये बील!


अभिनेता राहुल बोस चंडीगड येथील पंचतारांकित जे डब्ल्यू मॅरियटमध्ये वास्तव्यास असताना त्याने मागविलेल्या दोन केळ्यांसाठी तब्बल ४४२ रुपये आकारण्यात आल्यानंतर यावर पुष्कळ वादंग होऊन अखेरीस हॉटेलला अवाजवी किंमत आकारण्यात आल्याबद्दल पंचवीस हजार रुपये दंडही करण्यात आला होता. सोशल मिडीयावर हे प्रकरण चांगलेच व्हायरल झाले होते. आता कुठे हे प्रकरण निवळते आहे तोच आणखी एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलने एका ग्राहकाला दोन उकडलेल्या अंड्यांसाठी तब्बल सतराशे रुपये आकारले असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ने प्रसिद्ध केले असून, लेखक कार्तिक धर यांनी मागविलेल्या दोन उकडलेल्या अंड्यासाठी हॉटेलच्या वतीने तब्बल सतराशे रुपये आकरण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. हे हॉटेल मुंबईमधील प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे.

अंड्यांसाठी आकारलेली रक्कम पाहून कार्तिक धर आश्चर्याने थक्क झाले, आणि त्यांनी हॉटेलने पाठविलेल्या बिलाचे छायाचित्र अपलोड करीत राहुल बोसला आपल्या ट्वीटमध्ये ‘टॅग’ करीत, ‘आंदोलन करू या का?’ अशी पोस्ट ही अपलोड केली आहे. कार्तिक धर यांनी शेअर केलेल्या या बिलाच्या छायाचित्रामध्ये केवळ उकडलेल्या अंड्यांसाठीच नाही, तर दोन ऑम्लेट्स साठी देखील सतराशे रुपये आकारले गेल्याचे दिसत आहे. कार्तिक धर यांचा ट्वीट व्हायरल झाला असून, त्यावर नेटीझन्सच्या धमाल प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत. यावर ‘अंड्यातून सोने ही बाहेर आले का’, इथपासून ‘हे अंडे देणारी कोंबडी अतिशय श्रीमंत घरातील असावी’ अश्या प्रकारचे अनेक धमाल ट्वीट पहावयास मिळत आहेत.

या बाबतीत हॉटेल व्यवस्थापनाकडून मात्र कोणतीच प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. गेल्या महिन्यात अभिनेता राहुल बोस याला चंडीगड येथील मॅरियट हॉटेलने दोन केळ्यांसाठी ४४२ रुपये आकारल्याने उभ्या राहिलेल्या वादामध्ये हॉटेलला जरी दंड करण्यात आला असला, तरी अवाजवी रक्कम आकारण्यामागे काहीच गैर नसल्याचे ‘फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स ऑफ इंडिया’ च्या वतीने सांगण्यात आले होते. बाजारामध्ये दहा रुपयांना दोन केळी मिळत असली, तरी हॉटेलच्या वतीने पुरविण्यात येणारी उत्तम सेवा, कटलरी, फळांसोबत पुरविले जाणारे इतर खाद्यपदार्थ, पंचतारांकित सोयी-सुविधा लक्षात घेता एखाद्या पदार्थाची किंमत अधिक असणे वावगे नसल्याचे मत फेडरेशनच्या वतीने मांडण्यात आले होते.

Leave a Comment