हॉलीवूड अभिनेत्यांशी निगडित ही रोचक तथ्ये तुमच्या परिचयाची आहेत का?


हॉलीवूडमधील अभिनेते केवळ अमेरिकेतच नाहीत, तर संपूर्ण जगातच अतिशय लोकप्रिय असल्याने त्यांचे खासगी जीवन, त्यांचे राहणीमान, याबद्दलची माहिती सातत्याने कुठे ना कुठे प्रसिद्ध होत असते. ही सर्व मंडळी जरी जगप्रसिद्ध सेलिब्रिटीज असली, तरी सर्वसामान्य माणसांप्रमाणे यांच्याही काही विशेष आवडीनिवडी असतात, एखाद्या गोष्टीचे विशेष आकर्षण असते, आणि एखाद्या गोष्टीची भीतीही मनात असते. उदाहरण द्यायचे झाले तर अभिनेता जॉनी डेप यांचे देता येईल. जॉनी डेप यांना विदुषकांची अतिशय भीती वाटते. विदुषकाच्या रंगविलेल्या चेहऱ्यावरील भाव अतिशय भीतीदायक असतात असे जॉनी यांचे मत आहे.

‘टायटॅनिक’ फेम अभिनेता लियोनार्डो डी कॅप्रियोच्या नावाबद्दल रोचक तथ्य असे, की त्याच्या आईने त्याचे नाव, सुप्रसिद्ध चित्रकार लियोनार्डो ड विन्ची यांच्या नावावरून ठेवले आहे. लियोनार्डो डी कॅप्रियोची आई गर्भवती असताना, इटलीमधील एका प्रसिद्ध वस्तूसंग्रहालयामध्ये लियोनार्डो ड विन्चीच्या सुप्रसिद्ध कलाकृती पहात होती. त्यावेळी तिच्या पोटातील बाळाने पहिल्यांदाच हालचाल केळी असल्याने तिने आपल्या जन्मलेल्या मुलाचे नाव लियोनार्डो ठेवले असल्याचे समजते.

सुप्रसिद्ध गायिका मडोना यांनी आपल्या गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्या एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करीत असत. मात्र काही दिवसांतच रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने त्यांना कामावरून काढून टाकले. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी ‘डोनट्स’ मागविले असता, त्याच्या डोनट्सवर नको इतकी डोनट जेली ओतण्याच्या सवयीपायी मडोनाला आपल्या नोकरीला मुकावे लागले होते. मडोनाप्रमाणे मारिया कॅरी देखील प्रसिद्ध अमेरिकन गायिका आहे. मात्र एखाद्या कार्यक्रमामध्ये गाण्यापूर्वी मारियाचे खास असे ‘प्री-कॉन्सर्ट रुटीन आहे. या रुटीनच्या अंतर्गत कार्यक्रमाच्या दरम्यान आवाज चांगला रहावा यासाठी मारिया कार्यक्रमापूर्वी पंधरा तास आधीपासून ‘डीह्युमिडीफायर्स’ लावलेल्या खोलीमध्ये झोपणे पसंत करते.

अभिनेत्री निकोल किडमन हिला फुलपाखरे आणि किड्यांची भयंकर भीती वाटते, तर अभिनेत्री डेमी मूर हिला निरनिराळ्या बाहुल्यांचा संग्रह करण्याची आवड आहे. किंबहुना डेमी कडील बाहुल्यांचा संग्रह हा संपूर्ण अमेरिकेतील सर्वात मोठ्या संग्रहांपैकी एक समजला जातो.

Leave a Comment