टीव्ही चॅनल निवडणे आता आणखी सोयीस्कर होणार


नवी दिल्ली – टीव्ही चॅनल ग्राहकांच्या मदतीसाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. ट्रायने यापूर्वीच डीटीएच आणि केबलधारकांना चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. पण हे स्वातंत्र्य घेताना काही कारणांनी ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे ट्राय या अडचणी दूर करण्यासाठी आता एका स्वतंत्र अॅपद्वारेच यावर तोडगा काढणार आहे. ग्राहकांना हवे ते चॅनेल्स कंपन्यांकडून न पुरवले जाण्याचे वारंवार घडणारे प्रकार, तसेच, चॅनल निवडीची कंपन्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सवर असलेली क्लिष्ट प्रक्रिया यामुळे ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर होण्यास आता ट्रायच्या अॅपमुळे मदत होणार आहे.

ट्रायने चॅनल निवडीबाबत नव्या धोरणाद्वारे सोपी प्रक्रिया ग्राहकांना उपलब्ध करुन दिली खरी. पण ट्रायच्या धोरणाकडे कंपन्यांनी डोळेझाक करत ग्राहकांचा त्रास कायम ठेवला. डीटीएच आणि केबल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांनी त्यासाठी ग्राहकांना चॅनल निवडीचे अधिकार दिले नाहीत. तसेच, ज्यांनी दिले त्या कंपन्यांनी चॅनल निवडीची प्रक्रिया इतकी क्लिष्ट करुन ठेवल्यामुळे ग्राहकाचा गोंधळ उडाला. परिणामी ग्राहकांनी कंपन्या म्हणतील तेच पॅकेज विशिष्ट दराने घेणे पसंत केले.

ट्रायने कंपन्यांच्या चालबाजीला आळा घालण्यासाठी आता नवे पाऊल टाकले आहे. आता एका नव्या अॅपची ट्राय निर्मिती करत आहे. ग्राहकाला या अॅपद्वारे आपल्या पसंतीचेच चॅनल निवडणे सोपे जाणार आहे. त्याचबरोबर या अॅपमुळे केबलचालकांच्या मुजोरगिरीलाही चांगलाच चाप बसणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, विविध कंपन्यांशी चर्चा करुन हे अॅप ट्रायने विकसित करण्याचे ठरवले आहे. तसेच, ग्राहकांना डीटीएच कंपन्या किंवा केबल चालकांच्या अॅपपेक्षा ट्रायचे अॅप वापरण्यास खूप सोपे असणार आहे. ग्राहकांना या अॅपद्वारे त्यांच्या कंपनीद्वारे सर्व प्रकारचे चॅनेल्स मिळवता येऊ शकतील. चॅनल निवडीबाबात स्वतंत्र धोरण लागू केल्यानंतर ट्रायकडे डीटीएच कंपन्या आणि केबल चालकांविरुद्ध हजारो तक्रारी दाखल झाल्या. ट्रायच्या या तक्रारींमधून असे ध्यानात आले की, अद्यापही ग्राहकांना अनेक मोठ्या कंपन्या चॅनल निवडीचे स्वातंत्र्य देत नाहीत. ट्रायने या तक्रारींच्या निवारणार्थ अनेकदा सूचना करुनही कंपन्यांनी कानाडोळा केल्यामुळे आता नवे अॅप घेऊन ट्राय येत आहे. लवकरच हे अॅप ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

Leave a Comment