विमान धावपट्टी सोडून गेले पुढे, मात्र मोठा अपघात टळला


प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टी सोडून पुढे गेले व मातीतून टेक-ऑफ घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोमवारी सकाळी ही घटना मॉस्कोच्या डोमोडेडोवॉ विमानतळावर घडली. विमानात 150 प्रवाशी प्रवास करत होते, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, विमान खाजगी एअरलाईन एस7 चे असून, ते धावपट्टीसोडून मातीतून टेक-ऑफ घेत आहे. टेक-ऑफ घेताना लाईटीचे काही खांबांना देखील धडक दिल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. रिपोर्टनुसार, या घटनेनंतर देखील विमानाचा प्रवास व्यवस्थित झाला व विमान रशियाच्या सिम्फरोपॉल विमानतळावर उतरले. मात्र नुकसान झाल्यामुळे रिटर्न फ्लाइटला उशीर झाला.

पाच लाइटीचे खांब टेक-ऑफ घेत असताना उद्धवस्त झाले. मात्र विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले की, यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झालेला नाही. तसेच ते म्हणाले की, या घटनामुळे विमानाला काहीही झाले नसून, टेक-ऑफ आणि लँडिंगवर याचा काहीही परिणाम झालेला नाही.