रिक्षात बसलेल्या प्रवाशांची संख्या बघून पोलिसांनी लावला डोक्याला हात

दिवसेंदिवस रस्ते अपघातात वाढ होत आहे. नागरिक देखील प्रवास करत असताना विशेष लक्ष देताना दिसत नाहीत. तेलंगणाच्या पोलिसांनी तपासणीसाठी एका रिक्षाला थांबवल्यावर त्यामधून एवढे प्रवाशी बाहेर निघाले की, चक्क पोलिस देखील आश्चर्यचकित झाले. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या रिक्षाचा व्हिडीओ करीमनगरच्या पोलिस कमिश्नरांनी शेअर केला. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, लोकांनी स्वतःची सुरक्षा करणे गरजेचे आहे. जेथे गाडीत जागा नसेल तर प्रवास करू नये. लोकांना समजायला हवे की, जास्त प्रवाशांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.

पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 15 हजार पेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. ड्रायव्हर तिमापूरवरून रिक्षा घेऊन येत होता. पोलिसांनी जास्त प्रवाशी बघत रिक्षा थांबवला मात्र त्यानंतर जे झाले त्याने पोलिस देखील आश्चर्यचकित झाले. ड्रायव्हरला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा प्रवाश्यांनी उतरण्यास सुरूवात केली. रिक्षामध्ये तब्बल 24 प्रवाशी बसलेले होते. पोलिसांनी रिक्षामधील प्रवाशांबरोबर सेल्फी देखील काढला.

काही दिवसांपुर्वीच तेलंगणामध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाचा अपघात झाला होता. यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला होता तर 6 जण जखमी झाले होते.