मेक्सिकोतील या गावमध्ये माणसांपासून पशूंपर्यंत बहुतांश दृष्टिहीन !


जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर आपल्या आश्चर्याला पारावर उरत नाही. असेच एक रहस्यमयी गाव मेक्सिकोमध्ये असून, या गावाला ‘अंधांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण असे, की जे कोणी या गावामध्ये गेले, त्यातील बहुतेक दृष्टिहीन झाले. यातून माणसे तर सोडाच, पण प्राणी-पक्षीही वाचलेले नाहीत. असे नेमके का घडते यामागे एक मोठे रहस्य असल्याचे म्हटले जाते. या गावाचे नाव ‘तिल्तेपक’ असे असून, या गावामध्ये ‘जोपोटेक’ जमातीचे लोक राहतात. असे म्हटले जाते, की या गावामध्ये जन्मणारी नवजात बालकांची दृष्टी जन्मतः सामान्य असते, मात्र काही दिवसांतच त्यांची दृष्टी अंधुक होऊ लागून अंततः पूर्णच निघून जाते.

या गावातील लोक आणि प्राणी अंध होण्यासाठी एक शापित झाड जबाबदार असल्याचे म्हटले जाते. ‘लावाजुएला’ नामक हे झाड दृष्टीसमोर येता क्षणी, जे या झाडाकडे पाहतात, त्यांची दृष्टी निघून जात असल्याची मान्यता या गावामध्ये रूढ आहे. केवळ माणसेच नाही, तर या झाडाकडे पाहणारे पशु-पक्षी देखील अंध होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार गावातील लोकांच्या आणि पशु-पक्ष्यांच्या दृष्टीहीन होण्यासाठी हे झाड जबाबदार नसून, यासाठी एक विषारी प्रजातीची माशी जबाबदार आहे. ज्याला कोणाला ही माशी डंख मारते, तिचे विष त्या व्यक्तीच्या अंगात भिनत असून, काहीच वेळात त्या व्यक्तीची किंवा प्राण्याची दृष्टी निघून जात असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले आहे.

या गावामध्ये एकूण सत्तरच्या आसपास घरे असून, एकूण तीनशे लोक या गावामध्ये राहतात. या लोकांच्या घराला केवळ दरवाजे असून, यांच्या घरांना खिडक्या नाहीत. गोलाकार झोपडीवजा घरांमध्ये हे लोक राहतात. या गावातील काही लोकांची दृष्टी मात्र अजून शाबूत असून, त्यांच्याच आधाराने गावातील इतर दृष्टीहीन लोकांचे दैनंदिन व्यवहार पार पडत असतात.

Leave a Comment