असे आहेत महिलांकरिता ज्येष्ठमधाचे फायदे


चुकीच्या पद्धतीने घेतला जाणारा आहार, आणि चुकीची जीवनशैली यामुळे आजकाल लोक तरुण वयातच तऱ्हेतऱ्हेच्या आजारांनी ग्रस्त होत आहेत. विशेषतः महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन आणि त्याद्वारे मासिक पाळीशी निगडित समस्या, पीसीओडी, थायरॉईड ग्रंथीशी निगडित आजार इत्यादी समस्या वाढताना दिसून येत आहेत. अश्या वेळी आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार ज्येष्ठमधाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. ज्येष्ठमध ही अतिशय गुणकारी औषधी असून यामध्ये कॅल्शियम, ग्लिसरायजिक आम्ल आहे. ज्येष्ठमध अँटी बायोटिक असून, यामध्ये असलेली प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ अनेक तऱ्हेच्या आरोग्याशी निगडित समस्यांवर उपयुक्त आहेत. ज्येष्ठमधाचे सेवन सामान्यतः सर्दी किंवा खोकला झाल्यास केले जाते, मात्र या शिवाय इतर अनेक समस्यांमध्येही ज्येष्ठमध गुणकारी ठरते.

ज्येष्ठमध त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अनेकदा प्रदूषण, शारीरिक किंवा मानसिक तणाव, अपुरे पोषण यांचे दुष्परिणाम निस्तेज त्वचा आणि केसगळतीच्या रूपात दिसून येऊ लागतात. अश्या वेळी ज्येष्ठमधाची पूड आवळ्याच्या चूर्णासोबत नियमित सेवन केली असता, या समस्या दूर होण्यास मदत होते. ज्या महिलांचा मासिक धर्म अनियमित असेल, किंवा मासिक धर्माच्या काळामध्ये ज्या महिलांना अत्यधिक रक्तस्राव होत असेल, त्यांच्यासाठी ज्येष्ठमध उपयुक्त आहे. यावर उपाय म्हणून महिलांनी दोन चमचे ज्येष्ठमधाची पूड, आणि चार ग्राम खडीसाखर पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याचे सेवन केल्याने आराम पडू शकतो. नवजात अर्भकाला स्तनपान कराविणाऱ्या मातांसाठीही ज्येष्ठमध अतिशय उपयुक्त आहे. अनेकदा नवजात अर्भकांना मातेचे दुध कमी पडते. अश्यावेळी मातेला दोन चमचे ज्येष्ठमध पूड, तीन चमचे शतावरी पूड आणि दोन ग्राम खडीसाखर एक ग्लास दुधामध्ये उकळून प्यायला दिल्याने मातांना दुध कमी येत असल्यास, ही कमतरता दूर होण्यास मदत होते.

अनेकदा सततच्या धावपळीने आणि मानसिक तणावाने शरीराला पुरेशी विश्रांती मिळू शकत नाही. अश्या वेळी सतत थकवा जाणवू लागतो. यासाठी दोन चमचे ज्येष्ठमध पावडरीमध्ये एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा मध घालून एकत्र करून हे मिश्रण गरम दुधासोबत सेवन केले असता शरीराची मरगळ दूर होऊन शरीरामध्ये चैतन्य निर्माण होण्यास मदत होते. ज्यांना पोटामध्ये अल्सर असतील त्यांच्यासाठी ही ज्येष्ठमध उपयुक्त असून ज्येष्ठमधाचे चूर्ण दुधामध्ये घालून नियमित सेवन केल्यास गुण येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment