नागालँडमध्ये आजही वास्तव्य करतात हिडीम्बेचे वंशज


महाभारताशी निगडित अनेक तथ्ये आपल्या परिचयाची आहेत. यातील अनेक तथ्ये आपण कथांच्या रूपात ऐकली, पुस्तकांच्या माध्यमातून वाचली, आणि अनेक माहितीपटांच्या रूपाने पाहिली देखील. कौरव-पांडवांचा इतिहास, त्यांच्याशी आणि त्यांच्या परिवारजनांशी निगडित अनेक तथ्ये आपल्याला माहिती आहेत. पण तरीही अनेक तथ्ये अशीही आहेत जी आपल्या फारश्या परिचयाची नाहीत. यातील एक तथ्य असे, की महाभारतामध्ये पांडवांपैकी भीमाची पत्नी असलेल्या हिडीम्बेचे वंशज आजही अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. हे सर्व वंशज भारतातील नागालँड राज्यामध्ये वास्तव्य करून असल्याचे म्हटले जाते.

या राज्याला त्याचे ‘नागालँड’ हे नाव १९६१ साली देण्यात आले. तत्पूर्वी या प्रांताचा उल्लेख ‘नागा हिल्स तुएनसांग एरिया’ या नावाने होत असे. सुरुवातीला हा प्रांत केंद्रशासित प्रदेश असून १९६३ साली एक डिसेम्बर रोजी या प्रांताला राज्याचा दर्जा देण्यात आल्याबरोबर हे स्वतंत्र भारताचे सोळावे राज्य बनले. अवघ्या राज्यामध्ये एकच मोठे रेल्वे स्थानक आणि एकच विमानतळ असलेले ही भारतातील एकमेव राज्य आहे. हे रेल्वेस्थानक आणि विमानतळ दिमापुर शहरात असून, या शहराला राज्याचे प्रवेशद्वार मानले जाते. दिमापुरच्या आसपास महाभारतकालीन अनेक अवशेष पहावयास मिळत असल्याचे म्हटले जाते. याच ठिकाणी हिडीम्बेचे निवासस्थान असून, या राजवाड्यामध्ये हिडींबा आपला भाऊ हिडिंब याच्यासोबत रहात असे.

या ठिकाणी आजही जमिनीवर बुद्धिबळाचा पट असून, पुरुषभर उंचीच्या बुद्धिबळाच्या सोंगट्याही या ठिकाणी पहावयास मिळतात. ही बुद्धिबळे हिडीम्बेची असल्याचे म्हटले जाते. यातील काही सोंगट्या भग्न झाल्या असल्या तरी काही सोंगट्या आजही उत्तम अवस्थेत आहेत. भीम आणि त्याचा पुत्र घटोत्कच याच सोंगट्यांचा वापर करून बुद्धिबळे खेळत असल्याची आख्यायिका आहे. तसेच पांडवांनी त्यांच्या वनवास काळामध्ये याच ठिकाणी अनेक दिवस वास्तव्य केले असल्याचे ही म्हटले जाते. दिमापुर शहराला एके काळी ‘हिडींबापूर’ या नावाने ओळखले जात असे. याच ठिकाणी असलेल्या आपल्या राजवाड्यामध्ये हिडीम्बेने भीमाशी विवाह केला असल्याचे म्हटले जाते. आताच्या काळामध्ये येथे ‘दिमाशा’ जमातीच्या लोकांची संख्या सर्वाधिक असून, हे स्वतःला हिडीम्बेचे वंशज मानतात.

Leave a Comment