या घटनांचे आजवर कोणीच देऊ शकले नाही स्पष्टीकरण


आजकालच्या डिजिटल, अतिप्रगत युगामध्ये माणसाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे असल्याचे म्हटले जाते. एखादी गोष्ट वरकरणी करी कितीही जटील वाटत असली, तरी कोणते ना कोणते तर्क लावून वैज्ञानिकांनी त्यामागची कारणे शोधून काढली आहेत. मात्र या प्रगत युगामध्ये देखील काही घटना अश्या घडत आहेत. ज्या नेमक्या कश्यामुळे घडत आहेत याचे स्पष्टीकरण वैज्ञानिक देखील आजवर देऊ शकलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर कोको नामक गोरिलाचे देता येईल. हे प्राणी जात्याच हुशार समजले जातात. पण कोको मात्र इतर गोरिलांच्या मानाने अगदी हटके आहे असे म्हणावे लागेल, याचे कारण असे, की सांकेतिक भाषेच्या द्वारे संवाद साधण्याचे कौशल्य कोकोला अवगत आहे, इतकेच नाही, तर तिच्या या संवाद-माध्यमाच्या द्वारे तिच्या तल्लख बुद्धीची झलक दिसत असून, तिच्या मनामध्ये असणारे विचार जाणून घेण्याची संधीही तिच्याशी संवाद साधणाऱ्याला मिळत असते. मुख्य म्हणजे कोको व्यक्त करीत असलेले विचारही असामान्य असतात. ‘प्राणी मृत्यू पावल्यानंतर कुठे जातात’ अस प्रश्न कोकोला विचारला गेला असता, ‘अतिशय आरामदायक विवरामध्ये’ मृत प्राणी जात असल्याचे कोको म्हणते ! कोणीही आधीपासून पढवून न ठेवताही तिने दिलेल्या या उत्तराने अर्थातच प्राण्यांना देखील तत्वज्ञान समजते का, यावर चर्चा सुरु झाली आहे.

चीनी राजकुमारी शिन झ्चुई हिचा मृत्यू अनेक शतकांपूवी, ख्रिस्तपूर्व १६३ साली झाला होता. तिच्या मृत्यूला दोन हजार वर्षे उलटून गेल्यानंतर तिची समाधी पुरातत्ववेत्त्यांना सापडली, या समाधीचे उत्खनन केले गेले असता, शिन झ्चुईचे जे अवशेष या कबरीमध्ये सापडले ते पाहून पुरातत्ववेत्ते आणि वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले. शिन झ्चुईचा मृतदेह दोन हजार वर्षांपूर्वी दफन केला गेला असला, तरी उत्तम स्थितीमध्ये होता. तिचे केस, डोळ्यांच्या पापण्या उत्तम स्थितीत होत्या. इतकेच नाही, तर तिच्या शरीरातील धमन्यांमध्ये रक्त होते आणि तिने मृत्यूच्या पूर्वी खाल्लेल्या भोपळ्याच्या बिया देखील तिच्या पोटात जश्याच्या तश्या होत्या. तिचे शरीर इतक्या उतम पद्धतीने कसे ‘प्रिझर्व्ह’ केले गेले असेल, याचे रहस्य आजतागायत वैज्ञानिकांना उलगडलेले नाही.

डेरेक ओमाटो या मनुष्याने २००६ साली केवळ त्याच्या परिवारालाच नाही, तर समस्त जगालाच आश्चर्याचा धक्का दिला होता. संगीताची आवाड असली तरी त्या बाबतीतले फारसे ज्ञान नसणारा डेरेक एका रात्रीत पियानो उत्तम वाजवायला लागला. इतकेच नव्हे, तर त्याने त्यानंतर पियानोवादनाच्या अनेक ‘कॉम्पोझिशन्स’ देखील तयार केल्या ! झाले असे, की वयाच्या ३९व्या वर्षी डेरेक पोहण्यासाठी स्विमिंग पूलवर गेला. स्विमिंग पूल फारसा खोल नव्हता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने डेरेकने जेव्हा पूलमध्ये सूर मारला, तेव्हा पूलच्या तळाशी त्याचे डोके आपटून त्याच्या मेंदूला जबर इजा झाली. या अपघातातून बरे होता होता डेरेकला पियानो वाजविण्याची कला आपोपाप अवगत झाली. या कलेमध्ये तो काही काळातच इतका निपुण झाला, की त्याने स्वतःच्या संगीतरचना बनविण्यासही सुरुवात केली !

चौदाव्या शतकामध्ये युरोपातील काही देशांमध्ये ‘डान्सिंग प्लेग’ची व्याधी पसरली होती. या विकाराने समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना देखील आजतागायत गोंधळात टाकले आहे. या विकाराने ग्रस्त झालेले लोक अचानक उठ्ठून नाचत सुटत असत. त्यानंतर अनेकांना हृद्यविकाराचा झटका येत असे, किंवा आरोग्याशी निगडित कोणतीतरी गंभीर समस्या उद्भवून रुग्णाचा दुर्दैवी अंत होत असे. त्या काळी या आजाराने सुमारे चारशेहूनही अधिक व्यक्तींना ग्रासल्याचे उल्लेख सापडतात. हा विकार ‘मास हिस्टरिया’चे उदाहरण तर नसेल या विषयीही अध्ययन केले गेले आहे, आपण या व्याधीच्या कारणांचे निश्चित निदान अजून होऊ शकलेले नाही.

Leave a Comment