फ्लॉवरप्रमाणेच फ्लॉवरची पाने देखील आरोग्यास उपयुक्त


साधारणपणे थंडीच्या दिवसांमध्ये मिळणारा फ्लॉवर आता वर्षभरही सहज उपलब्ध होऊ लागला आहे. ही भाजी जवळजवळ संपूर्ण भारतातच मिळणारी आहे. फ्लॉवरचा वापर निरनिराळ्या पदार्थांमध्ये करता येतो. अगदी साध्या भाजीपासून ते पराठे, पुलाव आणि चटकदार ‘गोभी 65’ सारख्या पदार्थांमध्येही फ्लॉवरचा वापर होतो. या पदार्थांमध्ये फ्लॉवरचा वापर करताना केवळ त्याची फुले तेवढी काढून घेतली जाऊन त्याची देठे आणि पाने टाकूनच दिली जात असतात. मात्र फ्लॉवर प्रमाणेच याची पाने देखील अतिशय पौष्टिक असून, आरोग्याच्या दृष्टीने यांचे सेवन उत्तम मानले गेले आहे.

फ्लॉवरच्या पानांमध्ये फ्लॉवरच्या मानाने दुप्पट प्रमाणात अधिक प्रथिने असतात. तसेच यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाणही फ्लॉवरच्या मानाने तिप्पट अधिक असते. कर्बोदकांचे प्रमाणही यामध्ये फ्लॉवर पेक्षा जास्त असून, यामध्ये डायटरी फायबरही जास्त आहे. फ्लॉवरच्या पानांमध्ये क्षारही मुबलक प्रमाणात आहेत. तसेच फ्लॉवरची पाने खाल्ल्यास ती, फ्लॉवर पुरवू शकेल त्याच्या दुप्पट प्रमाणांत उर्जा पुरवितात. या पानांमध्ये हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे. साधारण शंभर ग्राम फ्लॉवरच्या पानांमध्ये ६२६ मिलीग्राम इतके कॅल्शियम आपल्याला मिळते. त्यामानाने फ्लॉवर मध्ये प्रती शंभर ग्राममध्ये केवळ तेहत्तीस मिलीग्राम इतकेच कॅल्शियम आहे.

फ्लॉवरच्या मानाने फ्लॉवरच्या पानांमध्ये फॉस्फोरस अधिक असून, या पाण्यामध्ये लोहही भरपूर आहे. दर शंभर ग्राम फ्लॉवरच्या पानांमध्ये सुमारे चाळीस मिलीग्राम लोह आहे, तर हेच प्रमाण फ्लॉवरमध्ये केवळ १.२३ मिलीग्राम इतकेच आहे. त्यामुळे दर वेळी फ्लॉवरच्या समावेश आपल्या आहारामध्ये करताना फ्लॉवर सोबत त्याची पाने ही वापरावीत. ही पाने भाजीमध्ये, सूपमध्ये, किंवा तत्सम इतर पदार्थांमध्ये वापरता येऊ शकतात.

ज्या लहान मुलांची वाढ अपुरी होत असते, किंवा ज्या मुलांना सातत्याने अशक्तपणा असतो, त्यांच्यासाठी फ्लॉवरची पाने वापरली जावीत. यामुळे त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनमध्ये वृद्धी होऊन अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. ही पाने वाळवून त्याची पावडर करून ही पावडरही दररोज सेवन केल्याने फायदा होतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रातांधळेपणा कमी करण्यासाठी ही पाने अतिशय उपयुक्त आहेत. फ्लॉवरच्या पानांची पावडर बनविण्यासाठी ही पाने सावलीत वाळवावीत किंवा तव्यावर कोरडीच भाजून घ्यावीत. यातील पाणी संपूर्णपणे सुकले, की मग या पानांची पावडर करून तिचा वापर करावा. ज्या दिवसांमध्ये ताजी फ्लॉवरची पाने उपलब्ध नसतील, त्यावेळी या पावडरचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment