या वस्तूसंग्रहालयात खऱ्या ‘स्नोव्हाईट’च्या समाधीवरील ‘ग्रेव्हस्टोन’पाहण्याची संधी


‘स्नोव्हाईट आणि सात बुटके’ ही परीकथा आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली आहे. आजच्या तांत्रिक प्रगतीच्या काळामध्ये ही परीकथा आजच्या लहानग्यांच्या पिढीने अगदी थ्री डी चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावरही पाहिली आहे. पण स्नोव्हाईट ही केवळ एका परीकथेतील राजकुमारी नसून, तिचे पात्र एका खऱ्याखुऱ्या स्त्रीच्या जीवनावर आधारित होते, हे तथ्य फार कमी जणांच्या परिचयाचे असेल. जर्मनीतील एका वस्तूसंग्रहालयाच्या वतीने, त्यांच्या संग्रही याच खऱ्या ‘स्नोव्हाईट’च्या समाधीवरील ग्रेव्हस्टोन सध्या असल्याचे म्हटले आहे. १८०४ साली अचानक हा ग्रेव्हस्टोन गायब झाल्यानंतर याचा अकस्मात पुन्हा शोध लागला, आणि हा ग्रेव्हस्टोन त्यानंतर या वस्तूसंग्रहालयात आणला गेला असल्याचे संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या ‘खऱ्याखुऱ्या’ स्नोव्हाईटच्या समाधीवरील ग्रेव्हस्टोन पाहण्याची संधी सध्या वस्तूसंग्रहालयाने नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध करविली आहे. जर्मनीतील उत्तर बेव्हेरीया प्रांतातील बॅम्बर्ग येथील ‘डायोसीसन म्युझियम’ मध्ये हा ग्रेव्हस्टोन ठेवण्यात आला आहे.

हा समाधीवरील ग्रेव्हस्टोन मारिया सोफिया फॉन एरथाल नामक तरुणीच्या समाधीवरील असून, तिच्या जीवनावर ग्रिम ब्रदर्सनी लिहिलेल्या ‘स्नोव्हाईट’चे कथानक आधारित असल्याचे म्हटले जाते. ही परीकथा ग्रिम ब्रदर्सनी १८१२ साली लिहिली होती. मारिया सोफिया फॉन एरथालला ज्या ठिकाणी दफन करून तिची समाधी बनविण्यात आली होती, त्या चर्चची पडझड झाल्यानंतर उर्वरित अवशेषांमधून मारियाच्या समाधीवर असलेला ग्रेव्हस्टोन गायब झाला होता. अनेक वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर बॅम्बर्ग येथे राहणाऱ्या एका परिवाराच्या संग्रही हा ग्रेव्हस्टोन होता. आता या परिवाराने बॅम्बर्ग येथील डायोसीसन वस्तूसंग्रहालयाशी संपर्क साधून हा ग्रेव्हस्टोन या संग्रहालयाच्या सुपूर्त केला.

मारिया फॉन एरथाल हिचा जन्म ‘लोर आम मेन’ येथे झाला असून, या गावाला तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘स्नोव्हाईट सिटी’ म्हणूनही संबोधले जाते. मारियाचे बंधू मैन्झ येथील चर्चचे आर्चबिशप म्हणून कार्यरत होते. मारिया लहान असतानाच तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. मारियाच्या सावत्र आईने तिचा अतोनात छळ कल्याने तिचे बालपण मोठ्या कष्टाचेच ठरले. तिच्याच आयुष्यावर आधारित स्नोव्हाईटची परीकथा आधारित आहे, मात्र परीकथेचा शेवट गोड असला, आणि स्नोव्हाईटने राजकुमारासोबतचे आपले आयुष्य आनंदाने कंठिले असले, तरी वास्तविक मारियाचे पुढील आयुष्यही तिच्या बालपणाप्रमाणेच खडतर होते. मारियाने कधीच विवाह केला नाही. तिने आपले बालपण ज्या घरात व्यतीत केले, त्या घरापासून सुमारे साठ मैलांच्या अंतरावर मारिया एकटीच रहात असे. म्हातारपणी तिची दृष्टी जाऊन अखेरीस वयाच्या ७१व्या वर्षी तिचे निधन झाले. मारियाला ज्या चर्चमध्ये दफन केले गेले, त्याची पडझड झाल्यानंतर तिच्या भावाने बांधविलेल्या रुग्णालयामध्ये हा ग्रेव्हस्टोन ठेवण्यात आला होता. १९७० साली या रुग्णालयाचे पुनर्निर्माण करण्यात आल्यानंतर एका स्थानिक परिवाराच्या संग्रही हा ग्रेव्हस्टोन होता.

१९३७ साली मारियाच्या जीवनावर आधारित ग्रिम ब्रदर्सनी लिहीलेल्या कथेवर आधारित स्नोव्हाईटच्या परीकथेवर वॉल्ट डिस्नी यांनी प्रथम चित्रपट बनविल्यानंतर स्नोव्हाईट आणि सात बुटके यांच्या कथेला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी लाभली. त्यानंतरही या कथेवर आधारित अनेक चित्रपट आजवर बनविण्यात आले आहेत.

Leave a Comment