अॅरीझोना मधील लहानग्याची कर्करोगग्रस्तांसाठी आगळी वेगळी मदत.


ब्रोडी साउथगेट या नऊ वर्षीय मुलाला इतरांची होईल तितकी मदत करण्याची मनापासून आवड आहे. म्हणूनच अँथम नामक अॅरीझोना येथील लहानश्या शहरामध्ये राहणाऱ्या ब्रोडीने कर्करोगग्रस्तांना मदत करण्यासाठी एक आगळा वेगळा उपाय शोधून काढला. या लहानग्याने आपले केस भरपूर वाढू दिले, आणि त्यानंतर त्याने कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी ‘नॉन प्रॉफीट’ तत्वावर काम करणाऱ्या एका संस्थेला देऊ केले. त्याने दान केलेल्या केसंपासून कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी विग्ज बनविण्यात आले आहेत. आतापर्यंत ब्रोडीने दोन वेळा आपले केस वाढवून ते दान दिल्याने अनेक कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यापासून मदत झाली आहेच, शिवाय अॅलोपेशिया, ट्रीशोटिलोमेनिया सारख्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लहान मुलांना देखील यापासून फायदा झाला आहे.

कर्करोगग्रस्त लहान मुलांची भेट घेऊन त्यांची अवस्था पाहिल्यानंतर आपल्या परीने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ब्रोडी म्हणतो. आधीच इतक्या भयंकर विकाराने ही मुले शारीरिक दृष्ट्या कमकुवत झालेली असतात. त्यातून केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे डोक्यावरी केस गळून गेल्यानंतर या मुलांचा आत्मविश्वासही काहीसा कमी होताना पहावयास मिळतो. म्हणूनच आपले केस देऊन त्याचे विग्ज बनवून या मुलांना मिळावेत यासाठी ब्रोडीने त्याचे केस वाढवून दान करण्याची कल्पना योजली.

सुरुवातीला ब्रोडीने जेव्हा केस वाढविण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याचे मित्र-मैत्रिणी, शाळेतील इतर सहपाठी त्याला चिडवत असत. कोणी त्याला मुलगी म्हणत असे, तर कोणी काही. मात्र मित्र-मैत्रिणींच्या टिंगल टवाळीने देखील कर्करोगग्रस्त मुलांना मदत करण्याचा ब्रोडीचा निर्धार जराही डळमळला नसल्याचे ब्रोडीचे पिता बेन साउथगेट म्हणतात. मात्र ब्रोडीने त्याच्या परीने केलेली मदत जेव्हा इतरांना कळली, तेव्हा तो अर्थातच साऱ्यांच्याच प्रशंसेस पात्र ठरला. मात्र केवळ प्रशंसा मिळावी म्हणून आपण हे करीत नसल्याचे सांगून, त्याच्याच सारख्या लहान, पण कर्करोगग्रस्त किंवा इतर विकारांनी ग्रस्त मुलांना मदत करण्याची मनापासून इच्छा असल्यानेच आपण हे केले असल्याचे ब्रोडी म्हणतो.

Leave a Comment